सेना नगरसेविकेच्या पतीची पालिका अधिकाऱ्याला मारहाण

प्रभाग क्र. १९ च्या नगरसेविका मनीषा साईनाथ तारे यांच्या पतीने शिवीगाळ करीत मारहाण केली आहे.

kdmc
प्रतिनिधिक छायाचित्र

कल्याण डोंबिवली पालिकेचे मुख्य लेखा अधिकारी दिग्विजय चव्हाण यांना कल्याणमधील वायलेनगर प्रभाग क्र. १९ च्या नगरसेविका मनीषा साईनाथ तारे यांच्या पतीने शिवीगाळ करीत मारहाण केली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात चव्हाण यांनी तीन अनोळखी व्यक्तींविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

मुख्य लेखा अधिकारी चव्हाण वायलेनगरमधील एटीएममध्ये शनिवारी सकाळी पैसे काढण्यासाठी आले होते. सोबत त्यांची पत्नी होती. एटीएममध्ये गेल्यानंतर चव्हाण यांनी पैसे काढण्याची प्रक्रिया सुरू करताच, एक गृहस्थ बाहेरील काचेचा दरवाजा दरवाजा वाजवू लागला. पैसे काढून बाहेर आल्यानंतर चव्हाण यांनी त्या गृहस्थाला जाब विचारला. त्या वेळी ते गृहस्थ संतापले आणि पैसे काढण्यासाठी गेले. त्या वेळी बाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या दोन समर्थकांनी ते मनसेचे पदाधिकारी असल्याचे सांगितले. त्याचवेळी एटीएममधून बाहेर आलेल्या त्या गृहस्थाने चव्हाण यांना शिवीगाळ करीत मारहाण केली.

चालक, सुरक्षारक्षकांशी या व्यक्तीने हुज्जत घातली. चालक किंवा सुरक्षारक्षकांशी न बोलता माझ्याशी बोला, असे त्यांना सांगत होतो. मात्र त्यांनी आयुक्त, मुख्यमंत्री, पोलीस आयुक्त यांना हा विषय कळवितो, असे बोलण्यास सुरुवात केली. कालच्या प्रकारानंतर माझा वाहनचालक कारवाईच्या भीतीने घाबरला असून तो कामावर आला नाही. याप्रकरणी आपणही संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहोत.   – साईनाथ तारे, शिवसेना कार्यकर्ता

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena female corporator husband assault kdmc officer