जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे : आघाडी सरकारच्या काळात राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोंडी होत असल्याच्या तक्रारी शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून केल्या जात असल्या तरी ठाणे जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीपेक्षा शिवसेना सत्तेचा अधिक लाभार्थी ठरल्याचे चित्र  स्पष्टपणे दिसून येत होते. ‘कळवा-मुंब्रा मतदारसंघातील विकासकामांसाठी गेली दोन वर्षे निधीच मिळत नाही. निधी मिळावा म्हणून मी राज्य सरकारच्या मागे लागतो. मात्र निधी देण्यासाठी पोरासाठी बाप नेहमी तयार असतो. आम्ही मात्र पोरके ठरतो,’ अशी तक्रार गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीच एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत या पिता-पुत्रांच्या नावे जाहीरपणे केली होती.

गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी राज्य सरकारमधील सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गळचेपी होत असल्याचा तक्रारीचा सूर लावला आहे. एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत यांनीही शनिवारी प्रथमच समर्थकांपुढे येत राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना आमदारांना कसे लक्ष्य केले जात होते याचा पाढा वाचला. शिवसेनेच्या बंडखोर गटाकडून राष्ट्रवादीविरोधी ही ओरड  होत असली तरी गेल्या अडीच वर्षांत ठाणे जिल्ह्यात मात्र नेमके उलट चित्र दिसत होते.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद  शिंदे यांच्याकडे होते. शिवाय नगरविकास विभागाचे मंत्रीपदही त्यांच्याकडे असल्याने या काळात जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवर त्यांची  पकड असल्याचे पाहायला मिळत होते. राष्ट्रवादीने आव्हाड यांच्याकडे गृहनिर्माण मंत्रीपद सोपवून ठाणे जिल्ह्यात पक्षाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  पदाधिकाऱ्यांना शिवसेनेकडून डावलले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत होत्या.  निधिवाटपाच्या मुद्दय़ावरून तसेच महापालिकेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांवरून कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या तक्रारीही आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केल्या होत्या.

ठाणे, डोंबिवलीत मोठा निधी

ठाणे, डोंबिवलीत मोठा विकास निधी  मागील अडीच वर्षांच्या कालावधीत नगरविकास विभागामार्फत ठाणे, डोंबिवलीत विकासकामांसाठी मोठा निधी शिंदे यांनी वळविल्याचे पाहायला मिळाले. ठाण्यात रस्त्यांच्या कामासाठी १७१ कोटी, सुशोभीकरणासाठी १२० कोटी, डोंबिवली एमआयडीसी भागात रस्तेकामासाठी ११० कोटी तसेच इतर विकासकामांसाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला होता. ठाण्यातील रस्त्यांच्या कामांच्या निविदेत ठरावीक ठेकेदारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. नवी मुंबईतील उड्डाणपूल कामाच्या प्रकल्पासाठी शिंदे यांनीच आग्रह धरला होता. या कामात ३९१ झाडांची कत्तल होत असल्याचे लक्षात येताच जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी उड्डाणपूल उभारणीविरोधात जोरदार आंदोलन सुरू केले होते.

पोलीस नियुक्त्यांमध्येही राष्ट्रवादी बेदखल?

ठाणे जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये आव्हाडांसह राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी बेदखल केले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. साधारण दोन महिन्यांपूर्वी गृह विभागाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यास एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्र्यांकरवी स्थगिती आणल्याची चर्चा होती. ठाणे जिल्ह्यात शिंदे पिता-पुत्रांचा एकंदर कारभार पाहाता राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेची गळचेपी होते हे म्हणणे किती हास्यास्पद होते हे कुणाच्याही लक्षात येते, असा टोला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने लगावला. तर महाराष्ट्रात रार्ष्ट्वादीकडून शिवसेनेच्या आमदारांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना लक्ष्य केले जात होते. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही ओरड आहे, अशी भावना शिंदे समर्थकाने व्यक्त केली आहे.

पोरासाठी देताना आम्ही मात्र पोरके

कळवा येथील एका विकासकामाच्या शुभारंभ सोहळय़ात आव्हाडांनी टोलेबाजी करत नगरविकास विभागामार्फत होणाऱ्या निधिवाटपात राष्ट्रवादीवर कसा अन्याय केला जात आहे याचा पाढाच वाचला होता. ‘मी गेली दोन वर्षे सरकारकडून विकासकामांसाठी पैसे मागतो, मात्र पोरासाठी देताना आम्ही मात्र पोरके राहतो,’’ असे आव्हाडांनी  सुनावले होते. त्यावर खासदार शिंदे यांनीही आव्हाडांना प्रति टोला लगावला होता.