जयेश सामंत, लोकसत्ता

ठाणे : करोनासंसर्गामुळे सातत्याने लागू होणारे निर्बध आणि त्यानंतर ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा तिढा यामुळे गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुरू असलेली रखडपट्टी राज्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या पथ्यावर पडली आहे.

मुख्यमंत्री पद आणि नगरविकास विभाग  शिवसेनेकडे असल्याने मुंबई महानगर प्रदेशातील एखाद-दुसरा अपवाद वगळता जवळपास सर्वच शहरांमध्ये प्रशासनाच्या माध्यमातून या पक्षाची ‘सत्ता’ प्रस्थापित झाली आहे. उल्हासनगर महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ सोमवारी संपुष्टात आल्याने येथेही मंगळवारपासून प्रशासकीय राजवट सुरू होईल. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासकीय वर्तुळातील वर्चस्व भक्कम होणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार महापालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर-कुळगाव नगरपालिकांमधील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ दोन वर्षांपूर्वीच संपुष्टात आला आहे. या  निवडणुका तोंडावर असताना देशभर करोनाची साथ पसरली. त्यामुळे या निवडणुका सातत्याने पुढे ढकलाव्या लागल्या. या सर्व ठिकाणी दोन वर्षांपासून आयुक्तांमार्फत महापालिकेचा कार्यभार सुरू आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात मुंबई, ठाणे महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळही संपुष्टात आला. मंगळवारपासून उल्हासनगर महापालिकेतही प्रशासकीय राजवट लागू होत असल्याने मीरा-भाईदर आणि भिवंडीचा अपवाद वगळता ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण शहरी क्षेत्रात प्रशासकीय राजवट लागू झाली आहे.

सेनेला बळ

मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत वर्षांनुवर्षे शिवसेनेची सत्ता असली तरी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या तिढय़ामुळे निवडणुका लांबणीवर पडल्याने नवी मुंबई तसेच वसई-विरार या शिवसेनेसाठी नेहमीच पराभवाचा सामना करावा लागलेल्या शहरांच्या आर्थिक नाडय़ाही सध्या सेनेच्या हाती आहेत. नवी मुंबईत १९९५ मध्ये गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सत्ता प्रस्थापित केली होती. नाईकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर गेली २० वर्ष येथे शिवसेनेची डाळ शिजू दिलेली नाही. तीन हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचा अर्थसंकल्प असलेल्या या महापालिकेवर आयुक्त अभिजीत बांगर हे प्रशासक असले तरी  एकनाथ िशदे यांना प्रथमच येथे वर्चस्व प्रस्थापित करता आले आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि आता उल्हासनगर या शिवसेनेच्या ‘घरच्या मैदानात’ प्रशासकीय राजवटीमुळे िशदेशाही  आहे. वसई-विरार महापालिकेतही प्रथमच हितेंद्र ठाकूर यांना दोन वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तेविना रहावे लागत आहे. येथेही नगरविकास विभागाच्या माध्यमातून शिवसेनेचा वरचष्मा आहे.

विरोधकांमध्ये अस्वस्थता

नवी मुंबई महापालिकेतील मोठय़ा रकमेच्या निविदांमधील अनियमिततेविषयी भाजपचे स्थानिक आमदार गणेश नाईक यांनी शिवसेनेला लक्ष्य केले असून ठाण्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीने आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्यावर टीका सुरू केली आहे. भाजपनेही आयुक्त ‘शिवबंधनात’ असल्याची टीका करत प्रशासकीय राजवटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.