कल्याण- शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला.  शिवसेनेचे कल्याण जिल्ह्यातील एक महत्वाचे शिलेदार असलेले लांडगे हे शिंदे गटात आल्याने शिवसेनेला कल्याण जिल्ह्यात मोठा हादरा बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेतून बंडखोरी करत राज्यात सत्ता स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  ठाण्यात मोठे समर्थन मिळत आहे. असे असतानाही शिंदे गटाचे निष्ठावान मानले जाणारे लांडगे हे मात्र शिंदे गटात सामील होत नसल्याने विविध तर्कवितर्क लढविले जात होते. कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे हे शिंदे गटात सामील न होता मातोश्रीवरील बैठकांना हजेरी लावत असल्याने शिंदे गटात नाराजी व्यक्त केली जात होती.

डोंबिवलीत निष्ठावान शिवसैनिकांच्या बैठकांना हजेरी लावून उध्दव ठाकरे यांचे समर्थन त्यांच्याकडून केले जात होते. ठाणे जिल्ह्यातील महापालिकांमधील शिवसेनेचे बहुतांशी नगरसेवक, आमदार शिंदे गटात दाखल झाल्याने जिल्ह्यातील शिवसेनेते चलबिचल सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत लांडगे यांनी शिंदे गटात दाखल होण्याचा निर्णय घेतल्याने डोंबिवली, कल्याणमध्ये शिवसेनेला दुसरा दणका बसला आहे. गेल्या आठवड्यात कल्याण डोंबिवलीतील ४० हून अधिक नगरसेवकांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. गोपाळ लांडगे यांनी सांगितले,‘आपण शिंदे गटात दाखल झालो आहोत हे खरे आहे. शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि आनंद दिघे यांची शिकवण पुढे नेण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्याला माझे समर्थन आहे. काल शिवसेनेत अन्य पक्षातून आलेले आम्हाला जर शिवसेना शिकवणार असतील तर आम्ही मूळ शिवसैनिक आहोत. उपरे नाहीत. या सर्व गोष्टींचा न्याय आम्हाला वरून पण मिळणार नसेल तर ज्यांनी शिवसेना वाचविण्याची कणखर भूमिका घेतली आहे. त्यांच्या बरोबर राहणे योग्य आहे.’

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena kalyan district chief gopal landge resigns join eknath shinde group zws
First published on: 14-07-2022 at 23:10 IST