काम केल्याचे दाखवून ठेकेदाराला लाखो रुपये दिल्याचे उघडकीस; रस्ता आजही खराब अवस्थेतच

रस्ता दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात न करता ते काम झाल्याचे दाखवून कंत्राटदाराला लाखो रुपये दिल्याचे धक्कादायक प्रकरण वसईतील गिरीज येथे उघडकीस आले आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेनेने केला असून अशा सर्व कामांच्या चौकशीची मागणी केली आहे. महापालिकेच्या साहाय्यक अभियंत्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत काम नियमानुसारच झाल्याचा दावा केला आहे.

गिरीज ढोरकाई पाडा येथे बिलकाई देवी मंदिर ते मुख्य रस्त्यापर्यंत पेव्हर ब्लॉक पुरवणे आणि बसविणे या विकासकामांसाठी एप्रिल २०१६ रोजी निविदा काढण्यात आल्या होत्या. १५ मे २०१६ रोजी मेसर्स गुंजाळकर असोसिएटस यांच्या निविदा मंजूर करून कार्यादेश देण्यात आले. या कामासाठी ३ लाख ८९ हजार रुपयांची निविदा देण्यात आली. मात्र या भागातील रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या भागातील स्थानिक आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अतुल पाटील यांनी या कामाबाबात महापालिकेकडे विचारणा केली असता काम मंजूर करून पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. काम झाले तर रस्ता अपूर्ण होता. या प्रकरणाचा संशय आल्याने पाटील यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवली असता हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले.

पालिकेने दिलेल्या मााहितीनुसार या रस्त्याचे काम ३० जून २०१७ रोजी पूर्ण झाले आहे. रस्त्याचे काम झाल्यावर तंत्रज्ञांकडून कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ तपासून घेतली जाते. पालिकेने या कामाचे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ तपासून देण्याचे पत्रही दिले होते. या कामाची संपूर्ण रक्कम ठेकेदारास देण्यात आली. साहाय्यक अभियंत्याने हे काम पूर्ण झाल्याचा प्रमाणपत्रही सादर केले आहे. ३० जून २०१७ रोजी कामाची मोजमाप घेण्यात आले आणि काम योग्यरीत्या केल्याचे प्रमाणपत्र साहाय्यक अभियंत्यांनी दिले आहे.

अन्य ठिकाणी काम?

या रस्त्याचे काम अन्य ठिकाणी करण्यात आल्याचे पालिकेच्या अभियंते खासगीत सांगत आहेत. मग ज्या रस्त्याची निविदा काढली तिथे काम का केले नाही, असा सवाल करून या संपूर्ण गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी अतुल पाटील यांनी केली. साहाय्यक अभियंते आर. के. पाटील यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. काम नियमानुसार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच कुठलाही गैरप्रकार झाला नसल्याचे सांगितले. पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांना या प्रकरणावर विचारले असता या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

हा पूर्णपणे भ्रष्टाचार असून न झालेले काम दाखवून पैसे हडप करण्याचा प्रकार आहे. याबाबत त्यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. आजही तो रस्ता त्याच खराब अवस्थेत आहे, मग पालिकेने ठेकेदाराला पैसे का दिले? साहाय्यक अभियंत्याने काम झाल्याचे प्रमाणपत्र का सादर केले?

– अतुल पाटील, शिवसेना नेते