ठाणे : लढाई अस्मितेसाठी, लढाई मराठीसाठी असं म्हणत, शिंदेंच्या ठाण्यात मेळाव्याआधी दोन्ही ठाकरेंचे म्हणजेच शिवसेना (ठाकरे) आणि मनसे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले. जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत म्हणत दोन्ही कार्यकर्त्यांनी मुंबईतील मेळाव्याच्या दिशेने वाट धरली.

मराठी भाषेवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण तापले आहे. हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज, शनिवारी विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने सुमारे दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र येत आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात शिवसेना (ठाकरे) आणि मनसेचे कार्यकर्ते एकवटल्याचे चित्र आहे.

मुंबईतील वरळी येथील एन. एस. सी.आय.डोम येथे हिंदी सक्ती आदेश रद्दच्या निर्णयाचा विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी शनिवार सकाळपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात शिवसेना (ठाकरे) आणि मनसेचे कार्यकर्ते चौकाचौकात एकत्र जमले होते. यानिमित्ताने दोन्ही पक्षांचे मनोमिलन झाल्याचे चित्र दिसून येत होते. या मेळाव्याच्या पूर्वसंध्येला शिवसेना (ठाकरे) नेते राजन विचारे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी एकत्रित बैठक घेऊन मेळाव्याचे नियोजन केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लढाई अस्मितेसाठी, लढाई मराठीसाठी, ज्यासाठी उतरले मराठी जन रस्त्यावर, असे म्हणत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एका सुरात जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत एका सुरत गात होते. चला तर मग येताय ना विजय साजरा करण्यासाठी अशा आशयाचे मजकूर असलेले फलक दोन्ही कार्यकर्त्यांच्या हातात होते. महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील मेळाव्याच्या दिशेने वाट धरली.