ठाणे : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळवा परिसरात महापालिकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या करोना लस महोत्सवावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद सुरू आहे. या महोत्सवासाठी लसीकरण केंद्रात शिवसेनेचे फलक लावण्यात आले असून यावरून आयुक्तांसह शिवसेनेवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीका केली आहे. त्यातच या महोत्सवाकरिता राष्ट्रवादीने परिसरात लावलेले फलक शनिवारी पहाटे फाडण्यात आले आहेत. यामुळे वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात लस महोत्सवाचे आयोजन गेल्या काही दिवसांपासून केले जात आहे. कळव्यातील आनंद विहार गृहसंकुल परिसरात अशाच महोत्सवाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून हा महोत्सव असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येत होता. या महोत्सवाचे फलक शिवसेनेने लसीकरण केंद्रात लावल्याचा दावा करत या मुद्दयावरून राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी आयुक्तांसह शिवसेनेवर टीका केली. महापालिका लसीकरण करीत असताना लसीकरण केंद्रात मात्र शिवसेनेच्या नेत्यांचे फलक लागलेले आहेत. लसींचे उत्पादन शिवसेनेने सुरू केले आहे का, असा प्रश्न त्यांनी खा. श्रीकांत शिंदे यांना विचारला आहे.

त्यातच या महोत्सवासाठी राष्ट्रवादीने परिसरात लावलेले बॅनर शनिवारी पहाटेच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने फाडले. यावर येत्या २४ तासांत कारवाई करावी अन्यथा, आम्ही पोलीस ठाण्याला घेराव घालू असा इशाराही परांजपे यांनी दिला आहे.

महापौरांनी आरोप फेटाळले

आरोग्य मंत्री राजेश टोपे हे दोन दिवसांपूर्वी ठाण्यात आले होते, त्यावेळी लसीकरणासाठी घरोघरी पोहचा असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार सर्वात कमी लसीकरण झालेल्या कळवा पूर्व भागात २७०० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहचून हे लसीकरण केले. इतकी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी हे फलक लावले होते. जितेंद्र आव्हाड यांच्याही लसीकरण केंद्राच्या प्रवेशद्वारावर फलक होते. त्यामुळे त्यांच्या आरोपात तथ्य नाही, असे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.

कारवाई करा-आव्हाड

फलक फाडल्याची घटना समजल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कळव्यामध्ये लसीकरणाच्या मोहिमेची लोकांना माहिती देण्यासाठी लावण्यात आलेले फलक काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी फाडले. त्याबद्दल पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली तर त्याची जबाबदारी आमच्यावर असणार नाही, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.