ठाणे महापालिकेमार्फत इंग्रजी माध्यमाचे ८ वी व ९ वी चे वर्ग खाजगी संस्थेमार्फत सुरु करण्यात यावे अशा स्वरुपाचा प्रस्ताव सत्ताधारी शिवेसेनेच्या नेत्यांनी पुढे आणला. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी टॅब आणि दप्तर विरहीत शाळेसारखे उपक्रम राबविण्याचे प्रस्ताव यापूर्वीच प्रशासनाने आखले आहे. या प्रस्तावांची अंमलबजावणी दृष्टिपथात असताना इंग्रजी माध्यमाच्या माध्यमिक वर्गासाठी थेट खासगीकरणाचा पर्याय स्विकारण्याचा प्रस्ताव आखण्यात आला आहे. यासंबंधीचा सर्वकक्ष प्रस्ताव प्रशासनामार्फत लवकरच मांडला जाईल, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती नरेश म्हस्के यांनी दिली.
महापालिकेअंतर्गत सावकरनगर शाळा क्रं. ३, किसननगर शाळा क्रं. २३ व  व मुंब्रा शाळा क्रं. ११८ येथे प्राथमिक विभागाच्या १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या येथील विद्यार्थी दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये भरमसाठ शुल्क भरून ते शिक्षण घेणे शक्य होत नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता आठवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी त्याच शाळेत प्रवेश घेता यावा यासाठी खासगी संस्थांच्या माध्यमातून इंग्रजीच्या तुकडय़ा सुरु कराव्यात, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. इंग्रजी शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने खासगी संस्थेच्या माध्यमातून शिक्षक उपलब्ध होतील, अशास्वरुपाचा प्रस्ताव शिवसेनेने मांडला आहे.