अंबरनाथ: शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि अंबरनाथ शहरातील शिवसेनेची महिला आघाडी बुधवारी अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्यालयात आमने-सामने आले. यावेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. किणीकर यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. अंबरनाथ नगरपालिका मुख्यालयात एकच गोंधळ उडाला. शहरातील प्रश्न घेऊन पालिकेत आले असताना आमदार दुसऱ्या सभागृहात पत्रकार परिषद कसे घेऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित करत महिलांनी त्यांना विरोध केला. तर आपण समस्यांबाबत मला कळवले नाही, मीही आलो असतो , असे यावेळी डॉ. किणीकर घोषणाबाजी करणाऱ्या महिला शिवसैनिकांना म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झालेले अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर मंगळवारी मतदारसंघात पुन्हा सक्रिय झाल्याचे पहायला मिळाले. बुधवारी आमदार डॉ. किणीकर यांनी अंबरनाथ नगरपालिका मुख्यालयात नव्याने मंजूर झालेल्या कामांबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र आमदार डॉ. किणीकर यांची पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या अंबरनाथ नगरपालिकेत हजर झाल्या. शहरातील शौचालय दुरावस्था, विविध ठिकाणी तुंबणारे पाणी, औषध फवारणी आणि गढूळ पाणी या समस्या घेऊन या महिला आघाडीने अंबरनाथ नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्या कार्यालयात ठाण मांडले. पालिकेचे मुख्याधिकारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. त्याचवेळी पालिकेच्या दुसऱ्या सभागृहात आमदार डॉ. बालाजी किणीकर, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ आणि पालिका अभियंत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद सुरू झाली. यावेळी शहरात मंजूर झालेल्या दोन रस्त्यांच्या कामाची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषद संपेपर्यंत या महिला कार्यालयात होत्या. पत्रकार परिषद संपवून आमदार डॉ. किणीकर सभागृहाबाहेर येताच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सदस्यांनी त्यांना गराडा घातला. आम्ही शहरातील समस्या घेऊन पालिकेत असताना आपण पत्रकार परिषद घेता, असा सवाल महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. तर यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनाही महिला कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले.

यावेळी आमदार डॉ. किणीकर आणि त्यांचे समर्थक शिवसेना महिला आघाडीच्या समोरासमोर आले. माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, महिला शहर संघटक नीता परदेशी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक झाली. शहरातील समस्या घेऊन आपण पालिकेत जाणार आहात याबाबत आपण मला काहीही कल्पना दिली नव्हती. समस्या असतील तर मला सांगाव्यात असे डॉ. किणीकर यावेळी म्हणाले. तर आमच्या मतांवर आपण निवडून आलेले आहात. आपण इकडे वेगळा गट करून आलात, असेही काही महिला कार्यकर्त्यांनी त्यांना सुनावले. त्यावर आम्ही शिवसैनिक आहोत वेगळा गट नाही, असे सांगत डॉ. किणीकर पालिका मुख्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर शिवसेनेच्यामहिला कार्यकर्त्यांनी आमदार डॉ. किणीकर यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पालिका मुख्यालयातील वातावरण काही काळ तणावाचे झाले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena rebels face off at municipal headquarters mla dr balaji kinikar amy
First published on: 06-07-2022 at 14:20 IST