शरद पवार गटाचे आजी, माजी १८ नगरसेवकांच्या पक्षबदलाची चर्चा

ठाणे : ठाणे महापालिकेची निवडणुक दिवाळीनंतरच होईल, असे अंदाज वर्तविले जात असले तरी, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. यातूनच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कळव्यातील राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे १८ आजी-माजी नगरसेवकांना गळ घालण्यास सुरूवात झाली असून यापैकी काहीजणांसोबत भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याचे सुत्रांकडून समजते. यामुळे कळव्यात पक्ष बदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ठाणे महापालिकेत आजवर शिवसेना-भाजपची सत्ता राहीली आहे. गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी हा पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत ६ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली. तेव्हापासून ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यातच ठाणे पालिकेची निवडणुक होईल, असे अंदाज वर्तविले जात होते. परंतु अद्यापही पालिकेची निवडणुक जाहीर झालेली नाही. असे असले तरी आता पुन्हा दिवाळीनंतरच पालिका निवडणुका होतील, असे अंदाज बांधले जात असतानाच, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कळव्यात पक्ष बदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी, वागळे इस्टेट परिसरात शिवसेना (शिंदे गट) पक्षाची तर, ठाणे शहर आणि घोडबंदर परिसरात भाजपची मोठी ताकद आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी आता आपला मोर्चा राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कळव्याकडे वळविला आहे. या भागातील राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या आजी-माजी नगरसेवकांना पक्ष प्रवेशाची गळ दोन्ही पक्षांकडून घातली जात असतानाच, यापैकी काहीजणांसोबत भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याचे सुत्रांकडून समजते.

नगरसेवक संख्याबळ ठाणे महापालिकेची २०१७ मध्ये नगरसेवक पदाच्या १३१ जागांसाठी निवडणुक झाली होती. त्यावेळी शिवसेनेचे ६७, भाजपचे २३, राष्ट्रवादीचे ३४, काँग्रेसचे ३, एमआयएमचे २ आणि अपक्ष दोन असे १३१ नगरसेवक निवडूण आले होते. यातील कळवा-मुंब्रा भागातील एकूण ३९ जागांमधून २८ नगरसेवक निवडुण आले होते. त्यात कळव्यातील १६ जागांचा समावेश होता. त्यामध्ये राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक निवडूण आले होते. त्यामुळे हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर हा परिसर कुणाचा बालेकिल्ला राहील अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर हा परिसर राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचा बालेकिल्ला असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दाखवून दिले होते.