कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत उध्दव बाळासाहेब पक्षातून आणि या पक्षाच्या मशाल चिन्हावर निवडून येऊन मतमोजणीनंतर मागील १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ठाकरे गटातील कल्याणमधील चार बेपत्ता नगरसेवकांना अपात्र करण्याची प्रक्रिया ठाकरे गटाच्या कल्याणमधील पदाधिकाऱ्यांंनी सुरू केली आहे. ही प्रक्रिया करताना या चारही नगरसेवकांच्या प्रभागात पोटनिवडणुकीच्या दृष्टीने जोरदार व्यूहरचना आखण्यास ठाकरे गटाने सुरूवात केली आहे.
ठाकरे गटाचे कल्याणमधील शहरप्रमुख बाळा परब, गटनेते उमेश बोरगावकर, नगरसेवक संकेश भोईर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या शुक्रवारच्या बैठकीत बेपत्ता असलेल्या ठाकरे गटातील ॲड. कीर्ति ढोणे, मधुर म्हात्रे, स्वप्नाली केणे आणि राहुल कोट यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याने कारवाई करून त्यांना अपात्र करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. यासंदर्भात कारणे दाखवा नोटिसा या बेपत्ता नगरसेवकांच्या घरी देण्यात आल्या आहेत. त्यांच्या घराला चिकटविण्यात आल्या आहेत.
या नगरसेवकांचा गेल्या पंधरा दिवसाच्या कालावधीत आमही ठिकठिकाणी शोध घेतला. ते कोठेही आढळले नाहीत. ते आमचे अपयश आम्ही समजतो. पण उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मतदारांशी प्रतारणा करून या चारही नगरसेवकांनी केलेली कृती कोणालाही आवडलेली नाही. त्यामुळे त्यांना अपात्र करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे ठाकरे गटाचे कल्याणचे शहरप्रमुख बाळा परब यांनी सांंगितले.
गेल्या आठवड्यात ठाकरे गटाचे माजी शहराध्यक्ष सचिन बासरे, शहरप्रमुख शरद पाटील, कल्याण लोकसभेचे जिल्हासंघटक अभिजीत सावंत यांंनी मिळालेल्या माहितीप्रमाणे नाशिक, इगतपुरी, डोंबिवली, मुरबाड परिसरात आपल्या चार बेपत्ता नगरसेवकांचा शोध घेतला होता. ते त्या भागात आढळून आले नाहीत.
पोटनिवडणुकांची तयारी
आपल्या चारही नगरसेवकांना अपात्र ठरविल्यानंतर पालिकेला त्या प्रभागात पोटनिवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे नगरसेविका ॲड. कीर्ति ढोणे यांच्या पालिका प्रभाग क्रमांक १३ अ मध्ये, नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या पालिका प्रभाग क्रमांंक १३ ड मध्ये, प्रभाग क्रमांंक ६ क मध्ये नगरसेविका स्वप्नावली केणे यांच्या प्रभागात आणि नगरसेवक राहुल कोट यांच्या प्रभाग क्रमांक ४ ब मध्ये पोटनिवडणुकांची तयारी ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. या चारही प्रभागांमध्ये ठाकरे गटाचा अधिक मतदार आहे. त्यामुळे आहे त्या पेक्षा अधिकच्या मतांनी आपला उमेदवार पोटनिवडणुकीत कसा निवडून येईल यादृष्टीने ठाकरे गटाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत.
ठाकरे गटाच्या बेपत्ता चार नगरसेवकांना २ फेब्रुवारी पालिका सभागृहात उपस्थित राहण्यासाठी पक्षादेश पाठविण्यात येईल. तो त्यांनी झुगारला तर त्यांच्यावर तातडीने अपात्रतेची कारवाई सुरू केली जाणार आहे. हे चारही बेपत्ता नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या रखवालीत असल्याची चर्चा आहे. पालिका सभागृहातील संख्याबळ वाढविण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने ही फोडाफोडीची कृती केली असल्याची चर्चा आहे. पालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने आपल्या पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते असलेल्या पण उमेदवारी न मिळाल्याने मनसे, ठाकरे गटात गेलेल्या उमेदवारांना प्रचारासाठी खमकी रसद पुरविल्याची चर्चा आहे.

