ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत फुट; शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांचे शिंदेंना समर्थन

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फुट पडण्याची शक्यता वर्तविली असतानाच, गुरुवारी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांनाच समर्थन असल्याचे जाहीर केले.

ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत फुट; शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांचे शिंदेंना समर्थन
शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के

ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फुट पडण्याची शक्यता वर्तविली असतानाच, गुरुवारी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांनाच समर्थन असल्याचे जाहीर केले. याशिवाय, ठाणे शहरभर शिंदे समर्थनाचे मोठे फलक लागले असून असेच काहीसे चित्र जिल्ह्याच्या इतर शहरांमध्ये आहे. यामुळे जिल्ह्यात शिंदे समर्थकांच्या शक्तीप्रदर्शनाला सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडीबरोबरच शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे हे ओळखले जातात. ऐरवी जिल्ह्यात झालेल्या बंदनंतर शिवसैनिकांकडून प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. पण, शिंदे यांच्या बंडानंतर शिवसैनिकांमधून अद्यापही प्रतिक्रिया उमटली नव्हती. यातूनच जिल्ह्यातील शिवसेनेत मोठी फुट पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि माजी नगसेवकांना संपर्क साधण्यास सुरुवात केली होती. परंतु त्यास पदाधिकाऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नव्हता. काही पदाधिकाऱ्यांनी फोन बंद ठेवत मौन बाळगले होते. यामुळे वरीष्ठ नेत्यांच्या प्रयत्नांना यश येत नसल्याचे दिसून येत असतानाच गुरुवारी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांंनी उघडपणे शिंदे यांना समर्थन जाहीर केले. म्हस्के यांनी समाजमाध्यांवर पोस्ट टाकली असून त्यात त्यांनी आम्ही तुमच्यासोबत…आमची साथ हिंदूत्वाच्या धगधगत्या ज्वाळांना असे म्हटले आहे. या पोस्टमध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो नाही. त्यांच्याबरोबरच काही माजी नगरसेवकांनीही शिंदे यांना समर्थन देत तसे फलक लावले आहेत. यामुळे जिल्ह्यात शिंदे समर्थकांच्या शक्तीप्रदर्शनाला सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन सुरु केले असून त्यांनी समाजमाध्यमांवर तशा पोस्टही टाकल्या आहेत. त्यावर काही शिवसैनिकांकडून प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. तुम्ही शिवसेना सोडाल, पण शिवसेना तुम्हाला सोडणार नाही, अशा प्रतिक्रीया शिवसैनिकांकडून समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
हरियाणातून विमानाने आलेल्या चोरांकडून कल्याणमधील ‘एटीएम’मध्ये चोरी; दोघांना अटक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी