डोंबिवली : ‘मी भाजपमध्ये जाणार नाही. असे काही ठरले नाही,’ अशाप्रकारे नाके मुरडून, चेहऱ्यावर नकली हास्य आणून आणि गालावर खळी पाडून बोलणारे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी अखेर भाजप प्रवेशाचा आपला निर्णय आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना शनिवारी रात्री घरगुती प्रीती भोजन कार्यक्रमात सांगितला. आणि कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सोबत येण्याची गळ घातली.

डोंबिवली जीमाखाना येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांच्या साहाय्याने हा भाजप पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. गणेशोत्सावाच्या काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गणपती दर्शनाचे निमित्त करून ठाकरे गटाचे डोंबिवलीतील जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांच्या डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव येथील घरी गणपती दर्शनासाठी गेले. तेथेच आणि त्याच दिवशी विघ्नहर्त्याने या दोघांमधील जुनेपुराणे वाद मिटवून टाकले. त्यानंंतर तीन महिने ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा वावड्या उठू लागल्या. या प्रवेशामागे त्यांचे कौटुंबिक नातेवाईक माजी खासदार कपील पाटील असल्याची चर्चा होती.

दीपेश म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करणार हे वृत्त पहिले ‘लोकसत्ता’ने दिले. या वृत्तावरून सुरूवातीला जिल्हाध्यक्ष म्हात्रे यांच्यासह ठाकरे गटातील इतर पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी चीड आणि थयथयाट केला. हे वृत्त साफ चुकीचे आहे. असे काही घडू शकत नाही, अशी या कार्यकर्त्यांची भूमिका होती. पण, त्याला अखेर तडा गेला आहे.

डोंबिवलीतील ठाकरे गटाचे एकमेव खिलाडी, हरहुन्नरी शिलेदार म्हणून दीपेश म्हात्रे यांनी गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत विविध प्रकारचे विकासाचे प्रश्न, नागरी समस्यांवर आवाज उठवून नागरिकांच्या मनात एक स्थान निर्माण केले. दीपेश म्हात्रे यांच्या भाजपमध्ये जाण्याने डोंबिवली ठाकरे गटाला मोठे खिंडार पडणार आहे.

प्रीती भोजन

दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटातील आपल्या निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना शुक्रवारी रात्री एकत्र बोलावून प्रीती भोजन दिले. आणि या प्रीती भोजनात दीपेश म्हात्रे यांनी आपण भाजपमध्ये जात आहोत. आपणही माझ्या सोबत यावे असे आग्रहाचे निमंत्रण आपल्या कार्यकर्त्यांना दिले. ठाकरे गटाशी एकनिष्ठ असलेल्या जुन्या जाणत्यांचा या प्रवेशाने हिरमोड झाला. साम, दाम, दंड आणि प्रसंगी भेद अशा पध्दतीने काम करण्याची दीपेश यांची कार्यपध्दती आहे. त्यामुळे भाजपला त्यांच्या निमित्ताने एक नवा दमदार खिलाडी मिळाला आहे.

यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या नंतर विधानसभेसाठी कोण…हा प्रश्नही यानिमित्ताने निकाली निघाला आहे. मागील दहा ते पंधरा वर्षापासून ज्यांची नावे विधानसभेसाठी भाजपमधून घेतली जात होती. त्यांची नावेही आता दीपेश म्हात्रे यांच्या आगमनाने मागे पडली आहेत. वारस तयार करून पुढची वाटचाल करणे ही भाजपची डोंबिवलीची परंपरा नाही. त्यामुळे दीपेश म्हात्रे यांचा प्रवेश भाजपसह राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवणारा मानला जात आहे. आगामी महापौर, आमदार सारखी स्वप्ने या पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून दीपेश म्हात्रे पाहू शकतात. रविवारी सकाळी मोठागाव येथील राहत्या घरापासून दीपेश म्हात्रे पक्ष प्रवेशासाठी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह डोंबिवली जीमखाना येथे पोहचणार आहेत. काही धक्कादायक असे प्रवेशही यावेळी होण्याची चर्चा आहे.