ठाणे : घोडबंदर येथील शिवसेना (ठाकरे गटाचे) पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्यावर मंगळवारी रात्री गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात पूर्णेकर यांना दोन गोळ्या लागल्या असून त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कार्यालयात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांनतर कोयत्यानेदेखील वार करण्यात आले.

याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पूर्णेकर यांच्या डोक्यात वार केले होते आणि मानेवरदेखील वार करण्यात आल्याचे आता स्पष्ट होत आहे. संपूर्ण परिसरात रक्ताचा सडा पडला आहे.

घोडबंदर परिसरातील मानपाडा भागाचे माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर यांचे प्रदीप पूर्णेकर हे भाऊ आहेत. पूर्णेकर हे शिवसेना (ठाकरे गटाचे) मानपाडा, मनोरमानगर आणि आझादनगर विभागाचे विभागप्रमुख आहेत. मंगळवारी रात्री त्यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोळीबाराची घटना समोर आल्यानंतर मानपाडा, मनोरमानगर आणि आझादनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. गोळीबारामागील कारण तसेच हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

प्रदीप पूर्णेकर हे नशामुक्तीच्या उपक्रमांसह पोलिसांच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत. तसेच समाजमाध्यमांद्वारे त्यांनी विविध सामाजिक विषयांवर आवाज उठविला होता. काॅक्रोज जनता पार्टीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनातही त्यांनी दिल्ली येथे जाऊन सहभाग घेतला होता. नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नी या ठाकरे गटाच्या उमेदवार होत्या. प्रदीप पूर्णेकर यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर ठाण्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.