१७ पैकी ११ जागा पटकावल्या

नव्याने झालेल्या शहापूर नगर पंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत १७ पैकी ११ जागा मिळवून शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी तीन जागा मिळाल्या. मात्र आठ जागा लढविणाऱ्या काँग्रेसला खातेही उघडता आलेले नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस या चारही प्रमुख पक्षांनी शहापूर नगर पंचायतीच्या निवडणुकीत स्वतंत्रपणे भाग घेतला. मात्र अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि शहापूरचे माजी सरपंच सतीश पातकर आणि दोन प्रभागांतून निवडणूक लढविणाऱ्या त्यांच्या पत्नी चित्रा पातकर यांची डाळ नगर पंचायत निवडणुकीत शिजली नाही.

अवघे एक मत

डॉ. भोपतराव यांना केवळ एकच मत पडले. त्यामुळे त्यांनी मतदार यंत्रणेविषयी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी प्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचे तालुका अध्यक्ष महेश धानके यांनी सांगितले.

मायलेकी नगरसेविका

प्रभाग क्र. आठमधून योगिता धानके या शिवसेनेतर्फे विजयी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांची मुलगी प्रज्ञा देशमुख ही भाजपच्या तिकिटावर प्रभाग क्र. ११ मधून निवडून आली आहे. प्रज्ञा देशमुखही शिवसेनेत होत्या. मात्र तिकीट नाकारल्याने निवडणुकीच्या आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.