ठाणे : डोंबिवलीतील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना छातीत दुखत असल्याची तक्रार झाल्याने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकीकडे डॉक्टरांकडून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असतानाच, दुसरीकडे त्याच रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करत रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली.
शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवरील हल्ल्यानंतर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रमेश म्हात्रे यांना अटक केली. अटकेनंतर प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगत त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी रुग्णालय परिसरात काळ्या फिती बांधून आंदोलन केले.
“डॉक्टरांवरील हल्ले बंद झाले पाहिजेत “
“आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या ” अशा घोषणा देत त्यांनी निषेध व्यक्त केला. तसेच डॉक्टरांवर हात उगारणाऱ्या लोकप्रतिनिधीला नगरसेवक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सांगत रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक तथा वरिष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. धीरज एस. महांगडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. डॉक्टर म्हणून आमचे कर्तव्य आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत आहोत. रमेश म्हात्रे यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू असून त्यांना आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. मात्र, उपचार करणे हे आमचे कर्तव्य असले तरी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचे समर्थन कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी, “रमेश म्हात्रे हे लोकप्रतिनिधी आहेत. उद्या त्यांच्यावर त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी अशाच प्रकारे हल्ला केला, तर त्यांना ते मान्य होईल का? मग डॉक्टरांवर हात उचलण्याचे समर्थन कसे होऊ शकते? आरोग्य सेवा देणाऱ्या प्रत्येक डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळालेच पाहिजे. त्यांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची आता गरज आहे, ” असे ठाम मत व्यक्त केले.
या आंदोलनात वरिष्ठ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत कठोर कायदेशीर कारवाई, रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे आणि दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
रमेश म्हात्रेला एकच मूत्रपिंड
रमेश म्हात्रे यांना सध्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्यांना एकच मूत्रपिंड असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तसेच म्हात्रे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु असून रमेश म्हात्रे यांना आज संध्याकाळी किंवा उद्या रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
