scorecardresearch

शिवसेनेकडून उद्घाटनांचा धडाका

सत्ताधारी शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनांचे आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम उरकण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे : महापालिका निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेनेने गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनांचे आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम उरकण्यास सुरुवात केली आहे. शिवशिल्प, बाळकुम तरणतलावाचे लोकार्पण आणि क्लस्टर पुनर्वसन इमारतीचे भूमिपूजन केल्यानंतर शिवसेनेने सोमवारी स्व. दादा कोंडके अ‍ॅम्पी थिएटरचे लोकार्पण, त्याचबरोबर पार्किंग व्यवस्था, सायकल मार्गिका प्रकल्प तसेच हँगिंग गार्डनच्या कामांचे भूमिपूजन केले.

सोमवारी झालेल्या सोहळय़ात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परबवाडी येथील स्व. दादा कोंडके अ‍ॅम्पी थिएटरचे लोकार्पण करण्यात आले. तसेच पार्किंग व्यवस्था, सायकल मार्गिका प्रकल्प आणि रहेजा गार्डन येथील सुविधा भूखंडावर हँगिंग गार्डनच्या कामांचे भूमिपूजनही पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे संकल्प चौक, रघुनाथ नगर ते ठाणे स्टेशन अशी नवीन परिवहन बस सेवेचा शुभारंभही या वेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्यासह नगरसेवक व पालिका अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमांच्या माध्यमातून विकासकामे केल्याचे चित्र उभे करण्याबरोबरच सत्ताधारी शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी शहरातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळे उरकण्याचे बेत आखले आहेत.

कार्यक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ

ज्येष्ठ सिनेकलाकार स्व. दादा कोंडके यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी पालिकेने त्यांच्या नावाने अ‍ॅम्पी थिएटर उभारले आहे. या अ‍ॅम्पी थिएटमध्ये ३०० ते ३५० प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था आहे. कलावंतांसाठी दोन ड्रेसिंग रूमसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून ठाणेकरांना सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण झाल्याचा दावा महापौर म्हस्के यांनी कार्यक्रमात बोलताना केला.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena municipal elections inauguration program of various development works akp

ताज्या बातम्या