Profile Of Shiv Sena Rajya Sabha Candidate Dr. Jyoti Waghmare: राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. विविध पक्षांकडून उमेदवारी जाहीर होत असतानाच शिवसेना (शिंदे गट) कडून जाहीर करण्यात आलेल्या एका नावाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या राज्य प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करत राजकीय वर्तुळात मोठे धक्कातंत्र दिले.
एकीकडे शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात असतानाच अचानक डॉ. ज्योती वाघमारे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून आंबेडकरी चळवळीतून पुढे आलेल्या या अभ्यासू आणि आक्रमक वक्त्या नेमक्या कोण, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
डॉ.ज्योती वाघमारे यांची नक्की ओळख काय ?
मुळच्या सोलापूर जिल्ह्यातील असलेल्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे या शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत सक्षम व्यक्तिमत्व मानल्या जातात. इंग्रजी साहित्यात त्यांनी पीएचडी प्राप्त केली आहे. शिक्षणात त्या लहानपणापासूनच उजव्या ठरल्या. दहावीच्या परीक्षेत त्यांनी ८४ टक्के गुण मिळवत उत्तीर्णता मिळवली, तर बारावीच्या परीक्षेत पुणे विभागातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. अर्धमागधी या विषयात राज्यात प्रथम येण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे. महिलांच्या प्रश्नांवरील त्यांच्या संशोधनाला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला असून शिक्षण क्षेत्रात त्यांनी दहा वर्षांहून अधिक काळ प्राध्यापिका म्हणून काम केले आहे.
भाषिक कौशल्याच्या बाबतीतही डॉ. ज्योती वाघमारे विशेष ठरतात. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि कन्नड या पाच भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यामुळे विविध राज्यांमध्ये जाऊन त्यांनी सामाजिक आणि वैचारिक व्याख्यानांद्वारे जनजागृती केली आहे.
त्यांची सामाजिक जडणघडण आंबेडकरी चळवळीच्या वातावरणात झाली. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. हॉटेलमध्ये वेटर म्हणून तसेच बांधकाम मजूर म्हणून काम करत त्यांनी कुटुंब सांभाळले. चळवळीतील त्यांच्या कार्याची दखल घेत सोलापूरमधील नागरिकांनी त्यांना सोलापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिले होते.
याच पार्श्वभूमीवर डॉ. ज्योती वाघमारे यांनी सुरुवातीच्या काळात मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. काही काळ त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केले. पुढे उच्चशिक्षणाचा उपयोग समाजप्रबोधनासाठी व्हावा या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानांद्वारे व्यापक जनजागृती केली. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी सोलापूरमधील वालचंद महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणूनही काही काळ अध्यापन केले. अभ्यासपूर्ण विचार, सामाजिक प्रश्नांवरील स्पष्ट भूमिका आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे त्यांची ओळख लवकरच व्यापक झाली.
मागील पंधरा वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी एप्रिल २०२३ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा स्वीकार करत पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची शिवसेना पक्षाच्या राज्य प्रवक्त्या आणि धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. मागील अडीच वर्षांत विविध टीव्ही चर्चासत्रे, राजकीय मंच आणि सभांमधून त्यांनी शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडली. शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राजकीय घडामोडींवर त्यांनी सडेतोड आणि मुद्देसूद भूमिका मांडत पक्षाच्या आक्रमक प्रवक्त्या म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील त्यांची भाषणे विशेष गाजली. सलग तीन वर्षांच्या दसरा मेळाव्यांत त्यांनी घणाघाती भाषण करत ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली होती. प्रभावी वक्तृत्व, महाराष्ट्राच्या इतिहासावरील अभ्यास, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधानावरील सखोल माहिती या गोष्टी त्यांच्या भाषणांमध्ये सातत्याने दिसून येतात.
उच्चशिक्षित, पीएचडीधारक आणि दलित समाजातून आलेल्या महिला नेत्या म्हणूनही त्यांची वेगळी ओळख आहे. सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा ग्रामीण चेहरा, आंबेडकरी चळवळीची पार्श्वभूमी आणि माध्यमांमध्ये प्रभावीपणे भूमिका मांडणारी प्रवक्त्या म्हणून त्यांनी अल्पावधीतच राज्याच्या राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आता शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. ज्योती वाघमारे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.
ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देऊन एकनाथ शिंदेनी काय साध्य केले ?
डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची उमेदवारी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच वेळी अनेक राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. उच्चशिक्षित महिला नेत्या पुढे करत महिलांना राजकारणात संधी देण्याची भूमिका त्यांनी अधोरेखित केली असून ‘लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ’ ही स्वतःची प्रतिमा अधिक बळकट करण्याचाही प्रयत्न यातून दिसून येतो. तसेच मोठ्या राजकीय घराण्यातील नसलेल्या, तळागाळातून पुढे आलेल्या कार्यकर्त्याला संधी देऊन शिवसेनेत घराणेशाही नसून सामान्य कार्यकर्त्यांनाही मोठी संधी मिळू शकते, असा संदेश देण्यात आला आहे.
आंबेडकरी चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या आणि मागासवर्गीय समाजातून आलेल्या नेत्या पुढे करत त्या समाजालाही राजकीय प्रतिनिधित्वाचा स्पष्ट संकेत देण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील चेहरा पुढे केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा प्रभाव वाढवण्याची राजकीय रणनीतीही यात दिसून येते. त्याचबरोबर मागील काही वर्षांत माध्यमांमध्ये आणि विविध मंचांवर आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडणाऱ्या प्रवक्त्याला उमेदवारी देत पक्षनिष्ठेला प्रोत्साहन देण्याचाही संदेश या निर्णयातून दिला गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
