ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून ठाणे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून सुरु असलेल्या चर्चेचा अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून उपनेते रविंद्र फाटक यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. सोमवारी रविंद्र फाटक हे नामनिर्देशनपत्र सादर करतील. ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची घोषणा झाल्यानंतर महायुतीतील भाजप आणि शिंदे गटामध्ये वाद उफाळून आला होता.

या मतदारसंघावर भाजपने दावा करण्यास सुरुवात केली होती. भाजपकडे ४४४ मतांचे संख्याबळ आहे. तर शिंदे गटाकडे ३४६ मते आहेत. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी किंगमेकरच्या भूमिकेत असल्याने महायुतीकडून क्षितीज ठाकूर यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु शिंदे यांना हा मतदारसंघ सुटल्याने रविंद्र फाटक यांना शिंदे गटाकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

यापूर्वी देखील रविंद्र फाटक हे आमदार म्हणून या परिषदेवर निवडून आले होते. उमेदवारी मिळाल्याचे कळताच फाटक यांनी टेंभीनाका येथे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच, त्यांना पक्षाचा उमेदवारी अर्ज देखील देण्यात आल्याचे कळते आहे.