शिवसेनेतून बंडखोरी करत राज्यात सत्ता स्थापन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागातील शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांकडून समर्थन मिळत असले तरी, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रमुख पदाधिकारी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दिसून येत आहे. भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी शिंदे गटाला पाठींबा दिला असला तरी त्यांना निवडुण आणण्यात महत्वाची भुमीका बजावणारे आणि एकेकाळी शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रकाश पाटील यांच्यासह ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे हे ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपुर्वी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन या दोन्ही नेत्यांनी केल्याचे दिसून आले होते. त्यामुळे जिल्ह्याचे शहरी भागात शिवसेनेत उभी फुट पडली असली तरी ग्रामीण भागात मात्र सेनेचे गड कायम असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे २१ वर्षांपुर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविली. जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत महिनाभरापुर्वी नवे सरकार स्थापन केले. या बंडाळीनंतर ठाणे जिल्ह्यातून त्यांना मोठे समर्थन मिळ‌त आहे. जिल्ह्याच्या शहरी भागातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक तसेच युवा सेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दर्शविला आहे. शहरी भागातील शिवसेनेत मोठी फुट पडल्याचे चित्र दिसत असले तरी ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी मात्र शिंदे गटात सामील होताना दिसत नाही. शिवसेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आणि जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे दिसून येते.

प्रकाश पाटील हे शिवसेनेचा ग्रामीण भागातील चेहरा म्हणून ओळ‌खला जातो. ग्रामीण भागात त्यांचा मोठा दबदबा आहे. मुख्यंंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांना निवडणुकीची उमेदवारी देण्यापासून ते निवडुण आणण्यात पाटिल यांनी महत्वाची भुमिका बजावली होती. शिवसेनेतील बंडाळीनंतर आमदार मोरे हे शिंदे गटात सामील झाले. त्यांच्यापाठोपाठ पाटील हे सुद्धा शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा होती. परंतु ते ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क म्हणून भिवंडीतील माजी आमदार रुपेश म्हात्रे हे काम पहात असून तेही ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे दिसून येते. शिवसेनेतील बंडाळीनंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु केली असून ही यात्रा ठाणे जिल्ह्यातील भिवंडी आणि शहापूर भागात पार पडली. या यात्रेचे नियोजन या दोन्ही नेत्यांनी केल्याचे दिसून आले होते. या संदर्भात दोन्ही नेत्यांची मात्र प्रतिक्रीया मिळू शकली नाही.

ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आणि ग्रामीण जिल्हा प्रमुख रुपेश म्हात्रे हे दोन्ही नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असून हे दोन्ही नेते पक्षाचे काम करीत आहेत. – केदार दिघे ,शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख