ठाणे – ठाण्यात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गेल्या २४ तासांत ११० झाडे कोसळल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर झाडांच्या फांद्यांची वेळेत छाटणी न केल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महेश कदम यांनी ठाणे महापालिकेविरोधात झाडांच्या फांद्या अंगावर बांधून अनोखे आंदोलन केले. यावेळी महापालिकेच्या निष्क्रिय कारभारावर जोरदार टीका करण्यात आली.

ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यात दरवर्षी झाडे कोसळण्याच्या घटना घडत असून यंदाही त्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात तब्बल ११० झाडे कोसळली, ३८ झाडांच्या फांद्या तुटल्या, तर १४ झाडे धोकादायक स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी महेश कदम यांनी झाडांच्या फांद्या अंगावर बांधून ठाणे महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात अनोखे आंदोलन केले.

यावेळी महेश कदम यांनी आरोप केला की, पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण आणि फांद्यांची छाटणी केल्याचा दावा महापालिका प्रशासन दरवर्षी करत असले, तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक भागांत झाडांची छाटणी झालेली नाही. त्यामुळे झाडे व फांद्या कोसळून वाहनांचे नुकसान होत असून नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे.

ठाणे महापालिकेचे वृक्षप्राधिकरण खाते हे सर्वाधिक भ्रष्ट खाते म्हणून ओळखले जाते. तीन महिने सातत्याने पत्रव्यवहार करूनही शहरातील धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्यात आलेल्या नाहीत. गेल्या ७२ तासांत ५० हून अधिक वाहनांचे नुकसान झाले असून महापालिका मुख्यालयासमोरच २५ ते ३० चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. प्रशासन झोपले असून नागरिकांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप महेश कदम यांनी केला. तसेच विकासकांच्या कामांमध्ये अडथळा येणारी झाडे काही क्षणात काढली जातात, मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी मात्र केली जात नाही.

“जर एखादे झाड विकासकांच्या कामात अडथळा ठरत असेल, तर त्यासाठी लाखो रुपयांचे व्यवहार होऊन ते झाड त्वरित हटवले जाते. मात्र नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या फांद्यांकडे दुर्लक्ष केले जाते, ” असा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी सांगितले की, वृक्ष प्राधिकरण विभागातील अधिकारी-कर्मचारी केवळ औपचारिक कामकाज करत असून नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहेत.

“जर महापालिकेकडे निधी नसेल, तर सत्ताधारी पक्षाने माणुसकीच्या आधारावर पुढाकार घेऊन झाडांच्या फांद्यांची छाटणी करून नागरिकांचे जीव वाचवावेत, ” असेही त्यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर त्यांनी आयुक्तांना निवेदन दिल्याची माहिती असून हे निवेदन नसून इशारा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वृक्ष प्राधिकरण विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांना जबाबदारीतून मुक्त करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या आंदोलनात जिल्हाप्रमुख केदार दिघे तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही सहभाग घेत निषेध नोंदवला.

जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनीही महापालिकेच्या कारभारावर टीका करताना, “पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, झाडांची छाटणी आणि सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रशासनाने सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात शहरातील विविध भागांत झाडे पडत आहेत, वाहनांचे नुकसान होत आहे आणि अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरत आहे. त्यामुळे ठाणेकरांचा कररूपाने भरलेला पैसा नेमका जातो कुठे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्य रस्त्यांवर केवळ दिखाऊ स्वरूपात छाटणी करण्यात आली, मात्र अंतर्गत रस्त्यांवरील धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष करण्यात आले. नागरिकांच्या हिताची कामे करण्याऐवजी प्रशासन केवळ दिखाऊपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केला.