कोपरी येथील शांतीनगर भागातील जलकुंभावरून पाण्याचे वितरण होणे अपेक्षित असतानाही माजी महापौर नरेश म्हस्के यांनी जलवाहीनीवर वॉल बसवून त्याद्वारे आनंदनगरला परस्पर पाणी वळविल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी केला आहे. तर, सर्वच भागांना समान पाणी वितरीत व्हावे यासाठी पालिका प्रशासनाने हे नियोजन केले असल्याचे सांगत महापौर म्हस्के यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या आरोप-प्रत्यारोपामुळे ठाणे पूर्वेत पाणी पळवापळवीच्या मुद्द्यावरून शिवसेना विरुद्ध भाजप सामना रंगल्याचे चित्र आहे.

संपुर्ण ठाणे शहरात विविध कारणांमुळे गेल्या काही महिन्यांपासुन पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असून त्यात ठाणे पुर्व म्हणजेच कोपरी भागात पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र आहे. कोपरी येथील शांतीनगर भागात जलकुंभ असून त्यातून सिद्धार्थनगर, शांतीनगर, आनंदनगर या भागांना पाणी पुरवठा होतो. ठाणे शहराला मुंबई महापालिकेकडून पाणी पुरवठा होत असून त्याचे कोपरी परिसरात नियोजन करण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून या भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. असे असतानाच, या भागातील शेवटच्या वसाहतींपर्यंत पाणी जावे यासाठी पालिका प्रशासनाने काही महिन्यांपुर्वी नियोजन केले असून त्यासाठी आनंदनगर भागातील जलवाहीनीवर वॉल बसविला आहे. बुधवारी रात्री याठिकाणी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांनी येऊन पाणी प‌ळावापळवी होत असल्याचा आरोप करत गोंधळ घातला. त्याचवेळी परिसरातील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांसह महिला जमल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याच मुद्द्यावरून भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी माजी महापौर म्हस्के यांच्यावर पाणी पळवापळवीचा आरोप केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असून ती सोडविण्याची मागणी प्रशासनाकडे केली जात आहे. परंतु प्रशासन शिवसेनेचे पदाधिकारी असल्यासारखे काम करीत आहेत. शांतीनगर भागातील जलकुंभावरून पाण्याचे वितरण होणे अपेक्षित असतानाही माजी महापौर नरेश म्हस्के यांनी जलवाहीनीवर वॉल बसवून त्याद्वारे आनंदनगरला परस्पर पाणी वळविले आहे. यामुळे कोपरी भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. तसेच मुंबई महापालिकेकडून ६ दशलक्ष लिटर वाढीव पाणी मंजूर करून घेतले तर, दोन्ही भागातील पाणी टंचाईची समस्या सुटेल, असेही ते म्हणाले. त्यास महापौर म्हस्के यांनीही प्रतिउत्तर दिले आहे. भरत चव्हाण यांनी कोपरीत चुकीच्या पद्धतीने मोठ्या जलवाहीन्या टाकल्या असून टाकीच्या परिघात येत नसलेल्या भागांमध्ये जलवाहीन्यांची जोडणी दिली आहे. यामुळे पाणी नियोजन कोलमडून टंचाईची समस्या निर्माण होत आहे. आनंदनगर भागातील शेवटच्या वसाहतीपर्यंत पाणी पोहचावे म्हणून पालिकेने वॉलचे नियोजन केले होते. जलकुंभ भरल्यानंतर आनंदनगर भागातील जलवाहीन्यांमध्ये वॉलद्वारे पाणी भरले जाते. त्यामुळे जलकुंभातून पाणी सोडल्यानंतर शेवटच्या वसाहतीपर्यंत पाणी पोहचते. शहराच्या इतर भागांमध्ये अशाचप्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. भरत चव्हाण हे अपयश लपविण्यासाठीच चुकीचे आरोप करून राजकारण करीत आहेत, असे म्हस्के यांनी सांगितले.