ठाणे – दिल्ली येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय एआय समिट दरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ ठाण्यातील राम मारूती परिसरात युवासेनेचे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी स्पीड पोस्टद्वारे बांगड्या पाठवण्यात आलेल्या आहेत. याची अधिकृत पावतीही शिवसेनेकडे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

दिल्ली येथे सुरु असलेल्या एआय समिट दरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले चड्डी बनियान आंदोलन, राहूल गांधी वारंवार करत असलेली देशविरोधी विधाने, संसदेचे कामकाज चालू न देणे अशा या सर्व गोष्टींचा निषेध आज टेंभी नाका येथील आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

त्यानंतर शहरातील राम मारूती रोड परिसरात शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील राम मारुती रोड परिसरामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी युवा सेनेचे कार्यकर्ते फलक हातात घेऊन सहभागी झाले होते. यामध्ये “रागा – देशवासियांची माफी मागा”, “काँग्रेसी चड्डी बनियन काय समजेल एआय ग्यान” नसेल बुद्धी तर एआय वापरा काँग्रेसच्या चड्डी बनियन गँगला आवरा अशा आशयाचे फलक हाती घेण्यात आले होते.

आंदोलनादरम्यान बोलताना शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे म्हणाले, भारत आज सर्वच क्षेत्रांत प्रगती करत असून देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत महासत्तेकडे वाटचाल करत आहे. ही प्रगती काँग्रेस आणि राहुल गांधींना सहन होत नसल्याने त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बदनामी करण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप त्यांनी केला. जगभरातील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांसमोर देशाची बदनामी करणे म्हणजे १४० कोटी भारतीयांचा अपमान आहे. हा प्रकार देशद्रोही मानसिकतेचा आहे, असा गंभीर आरोपही लोंढे यांनी केला.

या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने राहुल गांधी यांना प्रतीकात्मक स्वरूपात बांगड्या पाठवण्यात आल्या. राहुल गांधी दिल्लीतील येथील निवासस्थानी उपस्थित नसल्याने या बांगड्या स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याची अधिकृत ८९१ रूपयांची पावतीही शिवसेनेकडे उपलब्ध असल्याचे लोंढे यांनी सांगितले. तसेच कपडे काढून आंदोलन करण्यापेक्षा लोकशाही मार्गाने लढा द्यावा. लोकसभेत आणि विधानसभेत जनतेने काँग्रेसला आधीच उत्तर दिले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.