ठाणे– उधारीवर सिगारेट दिली नाही म्हणून टपरी वाल्याची हत्या केल्याचा प्रकार ठाण्यातील आझाद नगर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अनिकेत लक्ष्मण गायकवाड (२४) आणि सलमान फुरखान अन्सारी (२१) या दोघांना अटक केली आहे.

अनिकेत आणि सलमान हे दोघे रविवारी सोमवारी सायंकाळी आझाद नगर परिसरात असलेल्या विष्णू मनोहर कोटीकवार (५४) यांच्या टपरी वर गेले होते. त्या दोघांनी विष्णू यांच्याकडे उधारीवर सिगारेट मागितली. परंतु, विष्णु यांनी उधारीवर सिगारेट देणार नाही असे सांगितले. त्यावर संतप्त झालेल्या अनिकेत आणि सलमानने विष्णु यांना टपरीच्या  बाहेर घेऊन मारहाण केली. त्या मारहाणीत विष्णु यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.