गुन्हेवृत्त : नौपाडय़ात तीन सोनसाखळ्या चोरी

बोरीवली येथे राहणाऱ्या वसुदा मयेकर (६८) या ठाण्यातील ब्राह्मण विद्यालयासमोरून जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढला.

बोरीवली येथे राहणाऱ्या वसुदा मयेकर (६८) या ठाण्यातील ब्राह्मण विद्यालयासमोरून जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढला.
१५ हजार रुपये किंमतीची सोनसाखळी आणि ३० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार असा ४५ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरटय़ांनी लंपास केले. या घटनेनंतर काही वेळातच पाचपाखाडी येथे घडलेल्या दुसऱ्या घटनेत चंद्रवदन सोसायटीत राहणाऱ्या विजया पेडणेकर (६८) गणेशवाडी येथील मंगलप्रसाद इमारतीसमोरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरटय़ाने ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचले. खोपट भागात कैलास इमारतीत वत्सला गणपत देशमुख (७१) राहतात. मंगळवारी खोपट येथील परेरा सोसायटी येथून जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरटय़ांनी त्यांची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची माळ खेचून पलायन केले. नौपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लाच घेतल्याप्रकरणी हवालदारास अटक
ठाणे : दाखल असलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात मदत करण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारताना मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कौसा पोलीस चौकीचे हवालदार रंगराव पाटील (४७) यांना सोमवारी ठाणे लाचलुचपत विभागाने अटक केली. गुन्ह्यात तक्रारदार असलेल्याकडे पाटील यांनी १० हजारांची लाच मागितली होती. यासंर्दभात तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. मुंब्रा येथील कौसा पोलीस ठाण्याजवळ लाचेची रक्कम स्विकारताना पाटील यांना अटक करण्यात आली.

अपघातप्रकरणी मृत तरुणावर गुन्हा
भिवंडी : बेदरकारपणे टेम्पो चालवून स्वत:च्या मृत्यूला आणि इतर दोघांना जखमी केल्याप्रकरणी मृत रिंकू राकेश सिंग (२०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोनगाव येथील नाईकवाडी परिसरात राहणारा रिंकू हा सोमवारी दुर्गाडी पुलावरून भरधाव टेम्पो कल्याणकडे नेत होता. त्या टेम्पोमधून अविनाशचिकणे (२५) आणि त्यांचा मित्र हुसेन चांद बादशाह प्रवास करत होते. दुर्गाडी पुलावर रिंकु याचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो कल्याणकडे जाणाऱ्या गाडीवर आदळला.

कळवा-काजुवाडीत दोन घरफोडय़ा
ठाणे : कळवा नाका परिसरातील अल्फतेह इमारतीत राहणाऱ्या रहिमा अफजल फकीह (५१) यांच्या घरी मंगळवारी चोरी झाली. फकीह यांच्या घराच्या लाकडी दरवाजाचा कोंयडा उचकटून आणि दरवाजाचा खालचा भाग तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला. सोन्याचांदीचे दागिने, रोख असा एकूण चार लाख ९६ हजार ६०० रुपये किंमतीचा ऐवज लुटून नेण्यात आला आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडीच्या दुसऱ्या घटनेत काजुवाडी येथील अजिंक्य तारा इमारतीत राहणाऱ्या श्रीया संजय लाखन (३०) यांच्या घरी चोरी झाली. लाखन आणि त्यांचा मुलगा सोमवारी रात्री घरात झोपले होते. घराची आतील कडी उघडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केल्याचे मंगळवारी सकाळी लाखन यांच्या निर्दशनास आले. यात चोरटय़ांनी ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लुटुन नेले. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Short crime news from thane