ठाणे : आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांपाठोपाठ १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांनाही १० एप्रिलपासून वर्धक मात्रा देण्यास सुरुवात झाली आहे. करोना प्रादुर्भाव ओसरल्यामुळे तसेच निर्बंधांमध्ये शिथिलता मिळाल्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सात लाख ९३ हजार ४४३ जणांनीच लशीची वर्धक मात्रा घेतली आहे. जिल्ह्यातील लाभार्थी नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
करोना व ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर १० जानेवारीपासून आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ६० वर्षांवरील नागरिकांना वर्धक मात्रा देण्यात येत आहे. ज्या नागरिकांना दुसरी मात्रा घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत अशा नागरिकांना वर्धक मात्रा दिली जात आहे. या नागरिकांपाठोपाठ १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांनाही १० एप्रिलपासून वर्धक मात्रा देण्यास सुरुवात झाली आहे. या वयोगटातील नागरिकांना खासगी रुग्णालयात सशुल्क वर्धक मात्रा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांचे वर्धक मात्रा घेण्याचे प्रमाण कमी असल्याचे पाहायला मिळत आहे.
मागील काही दिवसांपासून करोना प्रादुर्भाव ओसरल्याबरोबरच निर्बंधांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची लसीकरण केंद्रावर तुरळक गर्दी दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांत आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि ६० वर्षांवरील केवळ सात लाख ९३ हजार ४४३ जणांनीच लशीची वर्धक मात्रा घेतली आहे. यामध्ये १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांचा आकडा खूपच कमी असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या वयोगटातील नागरिकांना वर्धक मात्रेसाठी पैसे मोजावे लागणार असल्यामुळे अनेक जण वर्धक मात्रा घेण्यास टाळाटाळ करत असल्याचेही समोर आले आहे.
लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न
जिल्ह्यातील लाभार्थी नागरिकांचे लसीकरण लवकर पूर्ण व्हावे यासाठी लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकरी राजेश नार्वेकर यांनी जिल्हा आरोग्य विभागाला दिल्या आहेत. शालेय परीक्षांमुळे १२ ते १४ वयोगटातील अनेक मुले आजही लसीकरणापासून वंचित आहेत. या वयोगटातील मुलांसाठी शाळास्तरावर लसीकरण सत्रांचे आयोजन करावे तसेच १८ वर्षांवरील नागरिकांचे समुपदेशन करून या वयोगटातील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना नार्वेकर यांनी दिल्या आहेत.
करोना प्रादुर्भाव ओसरल्यामुळे र्निबधही शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनातून आता करोनाची भीती नाहीशी झाली असून नागरिक आता वर्धक मात्रा घेण्यासाठी उत्सुक नसल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर नागरिकांची तुरळक गर्दी असते. – डॉ. अंजली चौधरी, जिल्हा लसीकरण अधिकारी ठाणे.