scorecardresearch

कल्याण पूर्व येथील खडेगोळवली भागात भीषण पाणी टंचाई. बंगले, इमारतींना बुस्टर पंपाद्वारे चोरून पाणी

चाळी,झोपडपट्टी परिसरातील इमारती,बंगले मालक,घरांना मुबलक पाणीपुरवठा होत आहे. एकाच भागत हा दुजाभाव पालिकेकडून का केला जात आहे, असा रहिवाशांचा प्रश्न आहे

कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. चाळी,झोपडपट्टी भागातील रहिवाशांना दिवसभरात पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवासी संतप्त आहेत. या भागातील संतप्त महिलांनी गुरवारी पालिकेच्या खडेगोळवली भागातील जलकुंभाजवळ येऊन पाणी टंचाई भागात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.

दिवसभर वणवण करून एक हंडा पाणी मिळत नसल्याच्या महिलांच्या तक्रारी आहेत. चाळी,झोपडपट्टी परिसरातील इमारती,बंगले मालक,घरांना मुबलक पाणीपुरवठा होत आहे. एकाच भागत हा दुजाभाव पालिकेकडून का केला जात आहे, असा रहिवाशांचा प्रश्न आहे. खडेगोळवली भागाचा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पालिका अधिकाऱ्यांकडे गेल्या वर्षभरात अनेक निवेदने देण्यात आली आहेत. त्याची दखल घेण्यात येत नाही, अशी खंत रहिवाशांनी व्यक्त केली.

खडेगोळवली भागाचा पाणीपुरवठा येत्या पंधरा दिवसात सुरळीत करावा. अन्यथा पालिकेवर हंडा मोर्चा आणला जाईल, असा इशारा माजी नगरसेवक विकी तरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिला. सार्वजनिक ठिकाणच्या नळावर तीन ते चार तासांनी पाण्यासाठी नंबर लागतो. या भागातील विहिरी वर्षानुवर्ष स्वच्छ केल्या नाहीत. कुपनलिकांमधील पाणी क्षारयुक्त असल्याने वापरण्या योग्य नाही, असे खडेगोळवली परिसरातील महिलांनी सांगितले.

मंगळवारी पालिकेच्या पाणीपुरवठा बंद असतो. दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. चाळी, झोपडपट्ट्या भागात तळाच्या टाक्या नाहीत. दररोज पालिकेकडून जे पाणी येते तेच पाणी रहिवाशांना साठा करून ठेवावे लागते. या भागातील बंगले मालक, इमारती चालक आपल्या सोसायट्यांना उच्च क्षमतेचे बूस्टर पंप लावून पाणी खेचून घेतात. त्यामुळे बंगले, सोसायट्यांना मुबलक पाणी पुरवठा होतो. चाळी, झोपडपट्टी भागाला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. खडेगोळवली शहराचे शेवटचे टोक आहे. मुख्य जलवाहिनी वरून शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाईपर्यंत त्याचा वेग कमी झालेला असतो. त्यामुळे या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, असे एका पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

पंपांवर कारवाई करणार

खडेगोळवली भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होतो. मंगळवारी पाणीपुरवठा बंद असला की त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी होतो. त्याच वेळी या भागातील काही रहिवाशांनी सोसायटी, बंगल्यांना बूस्टर पंप लावल्याच्या तक्रारी आहेत. या पंपांवर कारवाई करून खडेगोळवली भागाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे. – प्रमोद मोरे, कार्यकारी अभियंता, काकडी पाणीपुरवठा विभाग

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shortage of water in khadegolawali village of kalyan east asj

ताज्या बातम्या