भगवान मंडलिक
कल्याण : मागील १५ दिवसांपासून मध्य रेल्वेच्या कळवा ते कसारा, इगतपुरी, कर्जत ते लोणावळा विभागातील स्थानकांवर रास्त दरात मिळणाऱ्या रेल नीर पाण्याच्या बंदिस्त बाटल्यांचा तुटवडा जाणवत आहे. स्थानकांवरील जनजल योजना बंद, पाणीपुरवठय़ाचे नळ कोंडाळे नादुरुस्त आणि आता रेल नीरचा तुटवडा जाणवत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
कल्याण, ठाणे स्थानकांवरील उपहारगृहांमध्ये रेल नीर उपलब्ध आहे. उन्हाच्या काहिलीने हैराण प्रवाशांना सतत पाणी लागते. प्रवाशांनी रेल नीरची मागणी विक्रेत्याकडे केली की पर्यायी बाटली विकत घ्या असे विक्रेते सांगतात.
रेल नीरचा तुटवडा असलेल्या रेल्वे स्थानकांवरील खाद्यान्न विक्रेत्यांशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला. त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, रेल्वे खाद्यान्न आणि पर्यटन मंडळाने मध्य रेल्वेला पत्र पाठवून ३ ते २० मेपर्यंत कळवा ते कसारा रेल्वे स्थानकांदरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर, कर्जत, इगतपुरी, लोणावळा विभागातील स्थानकांवर रेल नीर पाण्याच्या पुरवठय़ात कपात करण्यात येत आहे. रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य विभागीय व्यवस्थापक टी. सुषमा यांनी या रेल्वे विभागातील सर्व स्थानकांवरील खाद्यान्न विक्रेत्यांना पत्र पाठवून रेल नीरचा तीन आठवडे तुटवडा होणार असल्याने, या बदल्यात मान्यताप्राप्त हेल्थ प्लस, रोकोको, गॅलन्स, निमबस, ऑक्सिमोह अॅबक्वा या पाणी बाटल्यांची विक्रेत्यांकडून खरेदी करावी, असे सुचविले आहे.
रेल नीरची एक बाटली १५ रुपयांना मिळते. इतर एजन्सीच्या बाटल्या २० रुपयांना विकल्या जातात. पाण्याच्या चढय़ा दरावरून प्रवासी, विक्रेते यांच्यात वाद होत आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले. रेल नीरचे घाऊक विक्रेते प्रत्येक स्थानकात जाऊन विक्रेत्यांना पाणी बाटल्यांचे खोके पोहच करत होते. इतर विक्रेते मुंब्रा, कळवा, कल्याण स्थानकात येऊन डोंबिवलीतील विक्रेत्याला मुंब्रा येथे या आणि साठा घेऊ जा, असे कळवितात. हा साठा आणण्यासाठी विक्रेत्यांनी दोन हजार रुपये टेम्पोचे भाडे द्यावे लागते.
रेल नीर १२ बाटल्यांचा खोका १२० रुपये, ऑक्सिमोर १२ बाटल्या एक खोका ११५ रूपये, निंबसचा १५ बाटल्या एक खोका ११८ रुपयांना विक्रेत्यांना मिळतो. रेल नीरच्या तुटवडय़ामुळे प्रवाशांना वाढीव किंमत मोजून पाणी विकत घ्यावे लागते. रेल नीरसह इतर बाटल्या अर्धा लिटरच्या केल्या तर प्रवाशाला हाताळणे सोयीचे होईल. एक लिटरची बाटली प्रवासी तात्काळ पीत नाही. ती बाटली घेऊन त्याला मिरवावे लागते, असे विक्रेत्यांनी सांगितले.
उन्हाचे दिवस आहेत. पिण्याच्या पाण्याची मागणी वाढते. त्याचा परिणाम रेल नीरवर होऊ शकतो. तरी नक्की कारण ‘आयआरसीटी’कडून समजून घ्यावे लागेल. -अनिलकुमार जैन, जनसंपर्क अधिकारी

रेल नीरचा कोणत्याही स्थानकावर तुटवडा नाही. मागणीप्रमाणे तो विक्रेत्यांना पुरवठा केला जातो. -सागर नाईक, मुख्य पर्यवेक्षक,रेल नीर.