scorecardresearch

ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस

वरिष्ठांनी काढलेले बदलीचे आदेश धुडकावल्याचे प्रकरण

ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस
(संग्रहीत छायाचित्र)

ठाणे महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव हे बदलीच्या ठिकाणी म्हणजेच वर्तकनगर प्रभाग समितीत हजर झालेले नसून याप्रकरणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात चोवीस तासाच्या आत खुलासा करण्याचे आदेश देत या मुदतीत समाधानकारक खुलासा प्राप्त झाला नाहीतर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे वरिष्ठांनी काढलेले बदलीचे आदेश धुडकावणे जाधव यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत.

ठाणे शहरात बेकायदा बांधकामांचे पुन्हा पेव फुटले असून या बेकायदा बांधकामांवरून पालिकेवर टीका होत आहे. असे असतानाच पालिका प्रशासनाने सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या केल्या. वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांची वागळे प्रभाग समितीत बदली करण्यात आली असून याशिवाय त्यांच्याकडे परवाना विभाग, क्लस्टर सेलचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. तर, कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांची वर्तकनगर प्रभाग समितीत बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे निवडणुक विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. ठाणे महापालिकेत बदली झालेले सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना कळवा प्रभाग समिती देण्यात आली आहे. या सहाय्यक आयुक्तांनी अतिरिक्त पदभारासह सोपविण्यात आलेल्या विभागांचा कार्यभार तात्काळ स्विकारुन अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिले.

समाधानकारक खुलासा प्राप्त झाला नाही तर शिस्तभंगाची कारवाई –

या बदल्यांचे आदेश १२ ऑगस्टला काढण्यात आले होते. परंतु समीर जाधव यांनी अद्याप बदली झालेल्या ठिकाणचा म्हणजेच वर्तकनगर प्रभाग समितीचा पदभार स्विकारलेला नाही. यामुळेच अतिरिक्त आयुक्त हेरवाडे यांनी जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात बदलीच्या आदेशानुसार पदभार स्विकारून तसा अनुपालन अहवाल सादर केला नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशाप्रकारे आपण वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केला आहे. तसेच ही कृती सेवाशर्तींचा भंग करणारी व कार्यालयीन शिस्तीचा अवमान करणारी गंभीर बाब आहे, असे हेरवाडे यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे. तसेच याबाबतचा खुलासा नोटीस मिळाल्यापासून २४ तासांचे आत सादर करावा. या विहीत मुदतीत तसेच समाधानकारक खुलासा प्राप्त झाला नाही तर आपल्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या