खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेचे बेमुदत ठिय्या आंदोलन | Loksatta

खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेचे बेमुदत ठिय्या आंदोलन

संघटनेचे संस्थापक पंडित यांच्यासह ३७ कार्यकर्ते ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत.

खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेचे बेमुदत ठिय्या आंदोलन
आंदोलकांनी काळ्या फिती लावून सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला.

श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि कार्यकर्त्यांविरोधात पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) निधी चौधरी यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत त्यांच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र दिनी श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील शासकीय विश्राम गृहाच्या बाहेर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले  आहे.

अंगणवाडी सेविकांचे मानधन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी पालघरच्या सीईओ निधी चौधरी यांच्या दालनात पोलीस संरक्षणात श्रमजीवीच्या विवेक पंडित यांनी आंदोलन छेडले होते. त्यानंतर, चौधरी यांनी आपल्याला घेराव घालून धक्काबुक्की केल्याचा गुन्हा श्रमजीवीच्या विवेक पंडित यांच्यावर दाखल केला होता. याबाबत,पंडित आणि कार्यकर्त्यांनी आपली बाजू मांडून जामिन न देता स्वत:ला पालघर पोलिसांच्या हवाली केले. गेले पाच दिवस विवेक पंडित यांच्यासह ३७ कार्यकर्ते ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत.

याप्रकरणी सीईओ निधी चौधरी यांच्याविरोधातील निषेधार्थ  श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा विद्युलता पंडित यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारी सकाळपासून श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्षा विद्युलता पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. सरकारने गुन्हा मागे घेतल्याशिवाय माघार न घेण्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला असून आंदोलकांनी काळ्या फिती लावून सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला. दरम्यान, या घटनेबाबत श्रमजीवीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेवून न्याय देण्याची मागणी केली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-05-2017 at 20:18 IST
Next Story
जलयुक्त शिवारसाठी श्रमदान करा, एकनाथ शिंदेंचे नागरिकांना आवाहन