ठाणे– आयोध्या येथे उभारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिरापासून गेले काही वर्षात सर्वत्र ठिकाणी श्रीराम नवमी ही मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. यंदाही श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर आठवडाभर आधीपासूनच श्रीराम यांचे प्रतिमा असलेले टी -शर्ट, टोपी, शाल अशा विविध वस्तूंनी बाजारपेठा फूललेल्या दिसत आहेत. विशेष म्हणजे, लहान मुलांचे ‘रामायण प्रेरित’ घरगुती फोटोशूट करण्याचा ट्रेंडही वाढत असून राम, सीता, हनुमान यांच्या वेशभूषा खरेदी करण्यासाठी पालकांची बाजारात गर्दी होत आहे.
ठाणे, मुंबई तसेच उपनगरातील बाजारात श्रीराम नवमी निमित्त विविध वस्तू दाखल झाल्या आहेत. ज्यामध्ये लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत श्रीराम यांची प्रतिमा असलेले टी-शर्ट, टोप्या, शाल, मफलर उपलब्ध झाल्या आहेत. शहराशहरांमध्ये श्रीराम नवमीच्या दिवशी भव्य मिरवणूका काढल्या जातात. यापार्श्वभूमीवर या वस्तूंना बाजारात मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारात श्रीराम यांची प्रतिमा असलेल्या टी-शर्टची विक्री २०० ते ४०० रुपयांपर्यंत केली जात आहे. तर, टोपी १०० ते १५० रुपयांपर्यंत आणि शाल २०० रुपयांपासून विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती ठाणे शहरातील जांभळी नाका बाजारपेठेतील एका विक्रेत्यांनी दिली. यामध्ये सर्वाधिक मागणी ही लहान मुलांच्या टी-शर्ट साठी असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर, अलिकडे नवजात बालकांचे प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या संकल्पना घेऊन फोटोशुट करण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे या महिन्यात श्रीराम नवमीच्या निमित्ताने अनेक पालक श्रीराम यांच्या वेशभुषेत बालकाचे फोटो काढण्यास प्राधान्य देत आहेत. यासाठी बाजारात श्रीराम यांचा संपूर्ण तयार पोशाख देखील उपलब्ध झाला आहे. लहान बालकांचा हा पोशाख ४०० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. अनेक ठिकाणी हा पोशाख भाडेदरावर देखील उपलब्ध असून १० वर्षाखालील मुलांचा पोशाख ३५० ते ४५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
त्यासह ‘राजा राम ’ स्वरुपातील दागिन्यांनसह वेशभूषेसाठी सुमारे ५०० रुपयापर्यंत खर्च येत असल्याचे वेशभूषा विक्रेता कांचन सुर्वे यांनी सांगितले. भाड्याने वेशभूषा घेणे हा पर्याय अधिक परवडणारा ठरत असल्यामुळे पालकांनी हे पोशाख घेण्यासाठी आगाऊ नोंदणी केली असल्याचेही सुर्वे यांनी सांगितले.
– मिरवणूकीसाठी लागणाऱ्या साहित्यावर युद्धाचा फटका
श्रीराम नवमीनिमित्त निघणाऱ्या मिरवणूकीत झेंडे, श्रीरामाची प्रतिमा असलेले पट्टे असे विविध साहित्य वापरले जाते. या सर्व साहित्याचा कच्चा माल हा सुरतवरुन येतो. परंतू, यंदा युद्धामुळे कारखान्यांमध्ये रसायनांचा तुटवडा निर्माण झाल्याने कारखाने बंद पडली असून यंदा पुरवठ्यात घट झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी या साहित्यांच्या दरात काहीप्रमाणात वाढ झाली आहे, अशी माहिती ठाण्यातील विक्रेते अरविंद साबु यांनी दिली.
– साहित्यांचे दर
१) बॅच
– १२० रुपये डजन
२) झेंडे –
३० ते १००० रुपये
३) कापडी फलक (५ बाय ७ फुट) – ५०० रूपये
४) मफलर – १२
ते १०० रूपये
५) दागिने – ५०० रूपये
६) कपडे – ३५० ते ४५० रूपये
