ठाणे – नवी मुंबई मध्ये अनेक दादा आले आणि अनेक दादा गेले मात्र शिवसेना आजही तिथेच पाय घट्ट रोवून उभी आहे पुढे ही उभी राहील. काही जण आज एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करत आहे. त्यांना एकच सांगायचं आहे. २०२२ साली एकनाथ शिंदे साहेबांनी महाविकास आघाडीचा टांगा पलटी केला नसता तर आज त्यांना भाजपा वाल्यांनी सुद्धा विचारलं नसत.
कुठे एका कोपऱ्यात पडले होते. एकनाथ शिंदे साहेबांची मेहेरबानी म्हणून मंत्रिपद भोगायला मिळत आहे. यामुळे कोणी जास्त बोलायला लावू नये, अशी थेट टीका खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर नाव न घेता केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ गावातील पिंपरी येथे प्रभाग क्रमांक १४ मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सुरुवातीच्या काळातील शितयुद्धाचे रूपांतर थेट मैदानातील युध्दात पाहायला मिळत आहे. नवी मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील वाद हे प्रकर्षाने पुढे आले आहेत. भाजपने संधी दिली तर एकनाथ शिंदे यांचा टांगा ही पलटी करेल आणि त्यांचे घोडे देखील बेपत्ता करून टाकेल. तर एकनाथ शिंदे यांच्या कडे हरामचा पैसा आहे. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे एकनाथ शिंदे यांना लवकरच जेलवारी करावी लागेल, अशी टीका ही गणेश नाईक यांनी केली होती. तर एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेश नाईक यांच्या विरुध्द थेट आक्रमक पवित्रा घेताना अद्याप दिसून आले नसले तरी त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून गणेश नाईक यांचा वेळोवेळी समाचार घेण्यात येत आहे.
पिंपरी येथे शिवसेनेचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला खासदार श्रीकांत शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी १४ गावही शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळेसही शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांना चौदा गावांमधून सहा हजारांहून अधिकचे मतदान झाले होते. त्यामुळे यंदाही आपलेच नगरसेवक निवडून येतील असे मत त्यांनी व्यक्त केले. तर विधानसभा निवडणुकीच्या वेळेसही राजेश मोरे यांना पाडण्याचे प्रयत्न अनेकांनी केले. मात्र शिवसेना या सर्वांना पुरून उरली.
आता काही जण एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत की त्यांचा टांगा पलटी करून टाकू. माझे त्यांना एकच सांगणे आहे की नवी मुंबई मध्ये अनेक दादा आले आणि अनेक दादा गेले मात्र शिवसेना आजही तिथेच पाय घट्ट रोवून उभी आहे पुढे ही उभी राहील. २०२२ साली एकनाथ शिंदे साहेबांनी महाविकास आघाडीचा टांगा पलटी केला नसता तर आज त्यांना भाजपा वाल्यांनी सुद्धा विचारलं नसत. कुठे एका कोपऱ्यात पडले होते. एकनाथ शिंदे साहेबांची मेहेरबानी म्हणून मंत्रिपद भोगायला मिळत आहे. यामुळे कोणी जास्त बोलायला लावू नये, अशी थेट टीका खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर नाव न घेता केली आहे.
तसेच त्यांचे वयोमान जास्त आहे म्हणून तोंडाला तोंड लावत नाही. एकनाथ शिंदे साहेब म्हणजे हाती चले अपनी चाल…..पुढची म्हण त्यांनी जोडून घ्यावी. आमच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचे संस्कार नाही, असे ही यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. यामुळे गणेश नाईक यांच्याकडून याला आता काय प्रतिऊत्तर देण्यात येते हे पाहणे महत्वाचे आहे.

