ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिंदेच्या शिवसेनेने आतापासूनच तयारी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई आणि ठाणे लोकसभेची जबाबदारी शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे तर, ठाण्याचे खासदार नरेश म्हस्केंची रवानगी भिवंडी व कल्याणमध्ये करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकांना बराच अवधी असला तरी शिंदेच्या शिवसेनेने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपर्क प्रमुख नियुक्त करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने राज्यातील विभागीय संपर्कप्रमुख आणि सह संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मंत्री भरत गोगावले, मंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री संजय राठोड, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार किरण सामंत यांच्यावर पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.

माजी आमदार दगडू सकपाळांची पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबईत सहा लोकसभा मतदार संघ आणि ठाणे लोकसभेची जबाबदारी शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भिवंडी व कल्याण लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदी खासदार नरेश म्हस्केंची निवड करण्यात आली आहे.

मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई या मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदार संघांच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. खासदार डॉ. शिंदेंसोबत मंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर मुंबईच्या लोकसभा मतदार संघांची जबाबदारी असेल. तसेच ठाणे लोकसभेचे संपर्कप्रमुखपद देखील खासदार डॉ. शिंदेंकडे सोपवण्यात आले आहे, असे पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

लोकसभा मतदार संघनिहाय संपर्कप्रमुख

डॉ. श्रीकांत शिंदे (मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, ठाणे), नरेश म्हस्के (भिवंडी, कल्याण), शिरीष चौधरी (नंदुरबार), भाऊसाहेब चौधरी (धुळे, दिंडोरी), दिलीप लांडे (जळगाव), तुकाराम काते (रावेर), संजय सोनार (बुलढाणा), राजन साळवी (अकोला), किशोर अप्पा पाटील (अमरावती), डॉ. मनीषा कायंदे (वर्धा), अनिल कोकीळ (रामटेक), संजय निरुपम (नागपूर), विलास चावरी (भंडारा-गोंदिया), जगदीश गुप्ता (गडचिरोली-चिमूर), कृपाल तुमाने (चंद्रपूर), प्रिती बंड (यवतमाळ-वाशिम), आनंदराव जाधव (हिंगोली), दत्ता दळवी (नांदेड), भास्कर आंबेकर (परभणी), संदिपान भुमरे (जालना), विलास पारकर (छत्रपती संभाजी नगर), सुहास कांदे (नाशिक), पांडुरंग पाटील (पालघर), अनिल नवघरे (रायगड), उदय सामंत (कोल्हापूर, मावळ, पुणे), किरण लांडगे (बारामती), शरद सोनवणे (शिरुर), राम रेपाळे (अहिल्यानगर), डॉ. ज्योती वाघमारे (शिर्डी), मनोज शिंदे (बीड), उन्मेष पाटील (धाराशिव), मंगेश कुडाळकर (लातूर), धैर्यशील माने (सोलापूर), चंद्रहार पाटील (माढा), योगेश जानकर (सांगली), शरद कणसे (सातारा), राजेश मोरे (रत्नागिरी), बाळा चिंदरकर (सिंधुदुर्ग), सुहास बाबर (हातकणंगले).