नवी मुंबई – राज्याच्या वनविभागात काय काय प्रकार चालू आहेत बऱ्याच गोष्टी कानावर आल्या आहेत. आम्ही त्याबाबत जास्त काही बोलत नाही. वनविभागाकडे पैशांची कमतरता असल्याने जंगलातील सागाची झाडं तोडून त्यांची विक्री करणार आणि त्यातून पैसे कमावणार आहेत. याबाबत माहिती घेणे देखील गरजेचे आहे. असा गंभीर आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बिबट्या शहरात येऊ नये म्हणून जंगलात शेळ्या सोडणार होतात. आता म्हणतात की आम्ही फळझाडे लावू. बिबट्या हे शाकाहारी आहेत की मांसाहारी हे पहिले माहिती करून घ्यावे मग वनखात्याचा कारभार करावा, असा टोला देखील खासदार शिंदे यांनी नाईक यांना लगावला.नवी मुंबईतील ऐरोली येथे शिवसेनेच्या नगरसेवकांचा अभिनंदन मेळावा पार पडला. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे बोलत होते.

राज्याचे वनमंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. यातच गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांना देखील माजी करून टाकू, त्यांचे राजकीय अस्तित्व मिटवून टाकू असा इशारा दिला होता. यानंतर खासदार शिंदे यांनी या टीकेला सडेतोड प्रतिउत्तर देत जर एवढीच खुमखुमी असेल तर येत्या निवडणुकीत माझ्यासमोर उभे राहा मग सगळी खुमखुमी उतरवतो असा थेट इशारा नाईक यांना दिला होता. यानंतर नाईक यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही.

मात्र आता शिवसेनेकडून गणेश नाईक यांना चांगलेच लक्ष्य करण्यात येत आहे. या वादात आता खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी देखील उडी घेतली असून गणेश नाईक यांच्या वनखात्याला त्यांनी लक्ष्य केले आहे. वनखात्यांच्या कारभाराबाबत अनेक गोष्टी कानावर पडत आहेत. वन खात्याकडे पैशाची कमतरता असल्याने जंगलातील सागाची झाड तोडून त्यातून पैसे कमावणार आहेत. असे वक्तव्य करत खासदार शिंदे यांनी राज्याच्या वनखात्यावरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर काही दिवसांपूर्वी बिबट्यांना जंगलातच रोखण्यासाठी जंगलात शेळ्या बकऱ्या सोडण्यात येतील असे काही जणांकडून सांगण्यात आले होते. मात्र आता तेच म्हणत आहे की जंगलात फळझाड लावू आणि बिबट्यांना रोखू. पहिले हे नक्की करा की बिबटे हे शाकाहरी आहेत की मांसाहारी. त्यामुळे आधी जंगलातील बिबटे सांभाळा मग शिवसेनेच्या वाघांच्या नादी लागा, असा इशारा ही त्यांनी नाईकांना दिला.

आज अनेक जण नवी मुंबई महापालिका जिंकली म्हणून फुशारक्या मारत आहेत. मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की अगदी निसटता विजय त्यांनी मिळवला आहे. आमच्या काही चुका झाल्या म्हणून आमचे काही नगरसेवक पडले. असे ही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवावी हम हम है बाकी सब पानी कम है. त्यामुळे येत्या लोकसभेत तुम्हाला दाखवून देऊ शिवसेनेची ताकद काय आहे. असा इशारा ही शिंदे यांनी दिला. परिवहन समितीच्या निवडणुकीत झालेल्या प्रकार बाबत शिंदे भाष्य करताना म्हणाले की महापालिकेत लोकशाही चालेल हुकूमशाही चालणार नाही. तर एकनाथ शिंदे हे एक शाखाप्रमुख ते थेट मुख्यमंत्री झाले. आज पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळत आहेत. त्यामुळे गणेश नाईक यांना एकनाथ शिंदें बाबत असूया आहे अशी टीका ही त्यांनी केली. तर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात नवी मुंबईसाठी घेतलेल्या विविध निर्णयांचा यावेळी त्यांनी पाढा वाचून दाखवला.

पालिकेतील खुर्चीच पलटी करून टाकू – खा.नरेश म्हस्के

नवी मुंबई महापालिकेत भारतीय जनता पार्टी नाही तर नाईक जनता पार्टी आहे. काहीजण महापालिकेत हुकूमशाही चालवत आहे. परिवहन समितीच्या निवडणुकीत गैरप्रकार करून नाईक पार्टीने आपले उमेदवार निवडून आणले. आम्ही सुद्धा महापालिकेचे नियम कोळून प्यायले आहोत. त्यामुळे तुम्हाला महापालिकेत कामच करू देणार नाही. तुम्ही टांगा पलटी करायची भाषा कराल तर आम्ही तुमची महापालिकेतली खुर्चीच पलटी करून टाकू, असा इशारा नरेश मस्के यांनी गणेश नाईक यांना दिला. नाईक यांच्याकडून मंदा म्हात्रे यांना देखील त्रास दिला जात आहे. आम्ही सर्व शिवसैनिक मंदा म्हात्रे यांच्या मागे खंबीर उभे आहोत असे ही म्हस्के यावेळी म्हणाले.