ठाणे : सण-उत्सवांच्या काळात कल्याण लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांवर उभारण्यात येणाऱ्या मोठमोठ्या राजकीय कमानींना आता चाप बसणार आहे. रस्ते अडवून राजकीय कमानी, फलक वा होर्डिंग उभारू नयेत, अशा सूचना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. शिवाय, रस्त्यावर अशा कमानी उभारण्यात आल्यास त्यांच्यावर कारवाईच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये व वाहतूक सुरळीत राहावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, कळवा, मुंब्रा परिसरात सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ वाढते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी यांसारख्या उत्सवांदरम्यान बाजारपेठा, प्रमुख रस्ते व सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी होत असल्याने आधीच वाहतुकीवर ताण येतो. त्यातच रस्त्यांलगत वा रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या आकाराच्या कमानी उभारण्यात आल्यास उपलब्ध रस्त्याची जागा आणखी कमी होते. परिणामी वाहतूक कोंडी वाढून त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो.

उत्सवाच्या काळात राजकीय कमानी उभारण्याची एक प्रकारची स्पर्धाच अनेकदा पाहायला मिळते. आपल्या नेत्याची सर्वांत मोठी कमान, सर्वाधिक बॅनर व शहरभर शुभेच्छांचे फलक लावण्याच्या या स्पर्धेमुळे नागरिकांना मात्र त्याचा त्रास सहन करावा लागतो. काही मिनिटांच्या राजकीय प्रसिद्धीसाठी रस्त्याची जागा अडवली जाते व त्याचा परिणाम काही तास वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या नागरिकांवर होतो. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्याची भूमिका आता घेण्यात आली आहे. स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही नियम पाळण्याचे स्पष्ट निर्देश देत सार्वजनिक रस्ते नागरिकांच्या वाहतुकीसाठी मोकळे ठेवण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.

‘इतर पक्षांचे माहीत नाही’

डोंबिवलीत रविवारी विविध सामाजिक संस्थांचा एक कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमात बोलताना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी राजकीय कमानी बाबत भाष्य केले. शिवसनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सणोत्सवाच्या काळात राजकीय कमानी कुठेही लावू नका, अशा सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच इतर पक्षांचे मला माहिती नाही मात्र शिवसेनेच्या कोणीही कमानी लावल्या तर त्यावर कारवाई करावी असेही पोलिसांना सांगितले असल्याचे यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.