भाजपच्या माजी नगरसेवकाच्या संकल्पना

ठाणे : शहरातील खाडीलगत असलेल्या वृंदावन आणि श्रीरंग वसाहतींच्या परिसरात समुद्र भरतीच्या वेळेत मुसळधार पाऊस झाल्यास गुडघाभर पाणी साचत असल्याचे प्रकार दरवर्षी दिसून येतो. या परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी चार ठिकाणी यंत्रणा उभारण्यात आली असून या नव्या उपाययोजनेमुळे सोमवारी भरतीच्या वेळेत मुसळधार पाऊस होऊनही या परिसरात अजिबात पाणी साचले नसल्याचे चित्र दिसून आले. परिसरात पाणी साचून घरातील साहित्यांचे नुकसान होण्याबरोबरच वसाहतीच्या वाहनतळात उभ्या असलेल्या वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत होते. याशिवाय, नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतो. परंतु नव्या उपाययोजनेमुळे नागरिकांची या त्रासातून आता सुटका झाल्याचे दिसून येत आहे.

ठाणे शहराच्या एका बाजुला डोंगर तर, दुसऱ्या बाजुला खाडी आहे. डोंगरातून वाहणारे नाले खाडीला येऊन मिळतात. याच नाल्यांना शहरातील सांडपाणी वाहून नेणारे छोटे नाले जोडण्यात आले आहेत. समुद्र भरतीच्या वेळेत मुसळधार पाऊस झाला तर, खाडी आणि नाल्यातील पाण्याची पातळी वाढते. यामुळे शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या छोट्या नाल्यातील पाणी मोठ्या नाल्यामधून पुढे जात नाही. उलट नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्याने त्यातील पाणी छोट्या नाल्यांमध्ये शिरते. त्यातच मुसळधार पाऊस सुरु असल्याने त्या पाण्याचा निचरा होत नाही आणि खाडीलगतच्या भागांमध्ये गुडघाभर पाणी साचते. असाच प्रकार खाडीलगतच्या वृंदावन आणि श्रीरंग भागात दिसून येतो. पाणी साचल्यामुळे परिसरातील वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा घराबाहेर पडण्याचा मार्ग बंद होतो. परिसरात शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांचेही प्रचंड हाल होतात. त्यावर मात करण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी नव्या उपायोजनेसंबंधीची संकल्पना पालिका आधिकाऱ्यांपुढे मांडली होती. त्यानुसार यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून पालिकेने गेल्यावर्षी ही यंत्रणा उभारली. परंतु पाणी उपसा करण्यासाठी बसविण्यात आलेले पंप योग्यरित्या काम करीत नसल्यामुळे पाण्याचा निचरा होत नव्हता. यंदाच्यावर्षी त्यातील त्रुटी दूर करण्यात आल्यानंतर ही उपाययोजना यशस्वी ठरू लागल्याचे दिसून येत आहे.

नवी यंत्रणा
ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील डोंगर भागातून येणारा मोठा नाला श्रीरंग भागातून जातो आणि तो पुढे खाडीला जाऊन मिळतो. या नाल्याला परिसरातील सांडपाणी वाहून नेणारे छोटे नाले जोडण्यात आले आहेत. वृंदावन भागात तीन ठिकाणी तर श्रीरंग भागात एक ठिकाणी छोटे नाले मोठ्या नाल्यांना जोडण्यात आले आहेत. या चार ठिकाणी नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर पाणी उलट आतमध्ये शिरू नये यासाठी एक लोखंडी गेट बसविण्यात आला आहे. तसेच छोट्या नाल्यांमधून येणारे पाणी पंपाद्वारे उपसा करून मोठ्या नाल्यात सोडले जात आहे. या नव्या उपाययोजनेमुळे सोमवारी भरतीच्या वेळेत मुसळधार पाऊस होऊनही या परिसरात अजिबात पाणी साचले नसल्याचे दिसून आले.

नागरिकांची त्रासातून सुटका
वृंदावन भागात शंभर गृहसंकुले तर, श्रीरंग भागात ३० गृहसंकुले आहेत. या परिसरात समुद्र भरतीच्या वेळेत मुसळधार पाऊस झाल्यास गुडघाभर पाणी साचत असल्याचे प्रकार दरवर्षी दिसून यायचे. यामुळे तळमजल्यावरील घरांमध्ये पाणी शिरून घरातील साहित्यांचे नुकसान व्हायचे. तसेच वसाहतीच्या वाहनतळात उभ्या असलेली वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत होते. वाहने नादुरुस्त होऊ नयेत म्हणून नागरिक सेवा रस्ता तसेच इतर भागात नेऊन वाहने उभी करायचे. परंतु नव्या उपाययोजनेमुळे आता नागरिकांचे हाल टळणार आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक मिलींद पाटणकर यांनी दिली.