ठाणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश उर्फ भय्याजी जोशींनी मराठीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी रात्री ठाकरे गटाने ठाणे रेल्वे स्थानक परिसरात स्वाक्षरी मोहीम हाती घेतली आहे. यावेळी भय्याजी जोशी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा निषेध महाविकास आघाडीकडून केला जात आहे. शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठाणे जिल्हा शाखेतर्फे ठाणे रेल्वे स्थानक परिसरात स्वाक्षरी मोहीम राबविली होती. या ठिकाणी दोन फलक उभारण्यात आले असून त्यावर भय्याजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत निषेध स्वाक्षरी मोहीम असे म्हटले आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात लाखो नागरिक ये-जा करत असतात. त्यामुळे हे फलक आता प्रवाशांचे लक्ष आकर्षित करत आहेत. या स्वाक्षरी मोहीमेस माजी खासदार राजन विचारे, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्यासह ठाकरे गटाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. रेल्वे स्थानक परिसरात भय्याजी जोशी यांच्याविरोधात ठाकरे गटाने घोषणबाजी केली.