scorecardresearch

ठाणे: क्लस्टर योजनेतील इमारत उभारणीची कामे लवकरच सुरु होण्याची चिन्हे

ठाणे महापालिका क्षेत्रात २५ ते ३० वर्षांपुर्वी उभारण्यात आलेल्या अनेक बेकायदा इमारती धोकादायक झाल्या असून त्यातील रहिवाशी जीव मुठीत घेेऊन वास्तव्य करित आहेत.

building
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

बाधित इमारतीच्या पाडकामासाठी निविदा काढण्याची तयारी; बांधकाम पाडकामाचे दर आणि ठेकेदार करण्यात येणार निश्चित

शहरातील बहुचर्चित समूह पुनर्विकास योजनेचा (क्लस्टर) पहिला टप्पा राबविण्यासाठी किसननगर भागातील प्रकल्पांच्या सविस्तर आराखड्यातील काही बांधकाम प्रकल्पांना नुकतीच मान्यता मिळाली असून त्यापाठोपाठ आता या योजनेत बाधित होणाऱ्या इमारती पाडण्याच्या कामासाठी निविदा काढण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरु आहे. यामध्ये बांधकाम पाडकामाचे दर आणि ठेकेदार निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. या प्रक्रीयेमुळे क्लस्टर योजनेतील इमारती उभारणीची कामे लवकरच सुरु होण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा >>>वाहन कोंडी टाळण्यासाठी पेंढरकर काॅलेज ते घरडा सर्कल वाहतुकीचे नियोजन

ठाणे महापालिका क्षेत्रात २५ ते ३० वर्षांपुर्वी उभारण्यात आलेल्या अनेक बेकायदा इमारती धोकादायक झाल्या असून त्यातील रहिवाशी जीव मुठीत घेेऊन वास्तव्य करित आहेत. अशा इमारती कोसळून अनेक रहिवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या नागरिकांना हक्काचे आणि सुरक्षित घर मिळावे यासाठी शहरात समुह पुनर्विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी शहरातील विविध भागांचे एकूण ४४ नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करण्यात आले असून त्याचे एकूण क्षेत्र १५०९ हेक्टर इतके आहे. ४४ पैकी १२ आराखडय़ांना यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. त्यात लोकमान्यनगर, कोपरी, किसननगर, राबोडी, टेकडी बंगला, हाजुरी, आझादनगर, गोकुळनगर, महागिरी, चरई, सिद्धेश्वर परिसर आणि स्थानक परिसर या भागातील आराखडय़ांचा समावेश आहे. एकूण १२ आराखड्यांना मंजुरी देण्यात आलेली असली तरी या योजनेचा पहिला टप्पा किसननगर भागात राबविण्यात येणार आहे. हा संपुर्ण परिसर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात येतो. किसननगर भागात क्लस्टर योजना राबविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला यापुर्वीच मंजुरी मिळाली असून त्यापाठोपाठ येथील काही बांधकाम प्रकल्पांनाही नुकतीच मंजुरी मिळालेली आहे.

हेही वाचा >>>कल्याण-मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला गती; रेल्वे मंत्रालयाकडून प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी अंतिम मंजुरी

सिडकोच्या माध्यमातून याठिकाणी योजना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे योजनेचे काम लवकरच सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही योजनेच्या कामासाठी बाधित इमारतींचे बांधकाम पाडावे लागणार असून त्याआधी रहिवाशांचे दुसऱ्याठिकाणी स्थलांतर करावे लागणार आहे. योजनेच्या कामाचा हा पहिला टप्पाच महत्वाचा मानला जात असून याच कामासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. या योजनेत बाधित होणाऱ्या इमारती पाडण्याच्या कामासाठी निविदा काढण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरु असून त्यात बांधकाम पाडकामाचे दर आणि ठेकेदार निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 15:57 IST