कल्याण – आपण माझे लैंगिक शोषण केले आहे, असा तक्रार अर्ज पुणे पोलिसांकडे करून हा अर्ज मागे घ्यायचा असेल तर आपण मला पुण्यात एक सदनिका आणि ५० लाख रूपये द्या. ते न दिल्यास मी तुमची बदनामी करून तुम्हाला तुरूंगात पाठविण्यासाठी पाठपुरावा करीन, अशी धमकी ज्येष्ठ लोकगीत, भीमगीत गायक आनंद प्रल्हाद शिंदे (६४) यांना देऊन त्यांच्या समर्थकांकडून एक लाख रूपये रोख खंडणी घेऊन नंतर उरलेले २४ लाख रूपयांची खंडणी देण्यासाठी तगादा लावणाऱ्या पुण्यातील कोथरूड निवासी आई, तिची मुलगी आणि मुला विरूध्द ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे खंडणीचा गुन्हा दाखल तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
ज्येष्ठ गायक आनंद शिंदे डोंबिवलीजवळील पलावा येथील कासाबेला गोल्ड भागात कुटुंबीयांसह राहतात. पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती, अशी तीन वर्षापूर्वी आपला मुलगा डाॅ. उत्कर्ष शिंदे यांच्या वाहनाचा चालक अक्षय कांबळे यांच्यामार्फत एक कुटुंब आपल्या घरी आले होते. यामध्ये आई, त्यांची मुलगी आणि मुलगा असा परिवार होता. आपली मुलगी छान नृत्य करते, तिला एखाद्या कार्यक्रमात घ्या, अशी गळ आईने आपणास घातली. संधी येईल तेव्हा सांगतो असे सांगून आपण या मुलीला आपण कोंबडा करतोय, एडाई देवी भक्तीगीतांमध्ये नृत्यासाठी संधी दिली होती. पुणे मुळशी येथे या नृत्याचे चित्रीकरण झाले होते. नंतर तिने चित्रपटातील संधीची मागणी केली होती. तिच्या आर्थिक अडचणीच्यावेळी आपण तिला साहाय्य करत होतो.
या नृत्य कलाकार तरूणीने धाराशिव येथील जमिनीला संरक्षित भिंत बांधण्यासाठी तातडीने आपणाकडे ५० हजार रूपयांची मागणी केली. गेल्या महिन्यात डाॅ. आंबेडकर जयंतीनिमित्त आपण धाराशिव भागात कार्यक्रमात व्यस्त होतो. त्यावेळी या तरूणीने आपणास ५० लाख पाहिजेत अशी मागणी करून दिले नाहीत तर तुम्ही माझे शारीरिक शोषण केले अशी पोलीस ठाण्यात तक्रार करते अशी धमकी दिली होती. त्यानंतर या तरूणीने आपल्या विरूध्द पुणे पोलिसांकडे आपण तिचे लैंगिक शोषण केले असल्याचा अर्ज केला. कोणतेही कारण नसताना ही तक्रार केल्याने आपणास धक्का बसला, असे शिंदे यांनी तक्रारीत म्हटले. आपण तिला फोन केला तेव्हा तिने नंतर फोन करते सांगून नंतर संपर्काला प्रतिसाद दिला नाही.
आपले सहकारी संबंधित तरूणीशी संवाद साधत होते. त्यावेळी शिंदे यांच्या मध्यस्थांना तरूणीने पुणे पोलिसांकडील तक्रार अर्ज मागे घ्यायचा असेल तर मला पुण्यात एक सदनिका आणि ५० लाख रूपये पाहिजेत असा निरोप शिंदे यांना दिला. शिंदे यांचे मध्यस्थ ही तरूणी, तिची आई आणि भावाच्या संपर्कात होते. पुणे कोथरूड येथे याविषयी बैठका सुरू होत्या. या बैठकीत आम्हाला ४० ते ३५ लाख रूपये द्या अशीच मागणी तरूणीकडून केली जात होती. मागणी मान्य होत नसल्याने ते बैठकीतून निघून जात होते.
अखेर तडजोडीने तरूणी आणि तिच्या कुटुंबीयांनी २५ लाख रूपयांची मागणी लावून धरली. या रकमेतील १ लाख रूपये आगाऊ रक्कम म्हणून तक्रारदार कुटुंबीयांने स्वीकारली. उर्वरित २४ लाख रूपयांची रक्कम देण्यासाठी पुण्याच्या कुटुंबाने तगादा लावला. ही रक्कम दिली नाही तर तुम्हाला तुरूंगात टाकीन, तुमची बदनामी करीन अशी धमकी पुण्यातील कुटुंबाने आनंद शिंदे यांना देऊन २४ लाख रूपयांची खंडणी जबरदस्तीने वसूल करण्याचा प्रयत्न केला म्हणून आपण ही तक्रार करत असल्याने गायक आनंद शिंदे यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे.
