कल्याण – पालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात सविता बिराजदार या महिलेचा रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने रुग्णालयाच्या प्रवेशव्दारात सोमवारी मृत्यू झाला होता. पालिका रुग्णालयात झालेल्या या महिलेच्या मृत्युप्रकरणीच्या हलगर्जीपणाला जबाबदार धरून आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशावरून वैद्यकीय आरोग्य विभागाच्या अहवालावरून सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी पालिकेच्या आस्थापनेवरील चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले. बाह्य स्त्रोत संस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात आणल्या आहेत.
रुक्मिणीबाई रुग्णालयातील परिचारिका प्रमुख जयश्री रायकर, रुग्णवाहिका चालक प्रमोद लासुरे, मारुती निकम, हरिचंद्र यशवंतराव यांना कर्तव्यात हलगर्जीपणा, अक्षम्य दिरंगाई आणि शासकीय सेवकास अशोभनीय कृत्य असा ठपका ठेवत पालिका सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. बाह्य स्त्रोत संस्थेचे डाॅ. उमेर पटेल आणि परिचारिका नमिता भोये यांच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील सेवा संपुष्टात आणण्यात आल्या आहेत.
रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. संदीप पगारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना यासंदर्भात खुलासा करण्याचे सूचित करण्यात आले आहे. डाॅ. संदीप पगारे यांचा खुलासा समाधानकारक नसेल तर त्यांच्यावरही प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे, असे सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
आयुक्त गोयल यांच्या या आक्रमक कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयात सविता बिराजदार या अत्यवस्थ असलेल्या महिलेला कळवा येथे रुक्मिणीबाई रुग्णालयातून स्थलांतरित करण्यासाठी पाच तासाच्या अवधीत रुक्मिणीबाई रुग्णालयाकडून किंवा अन्य साधनांच्या माध्यमातून रुग्णवाहिका मिळाली नाही. रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारात सविता यांचा त्यामुळे सोमवारी मृत्यू झाला होता.
या मृृत्यूप्रकरणामुळे विविध स्तरातून पालिकेवर टीकेची झोड उठली होती. राजकीय नेते मंडळींनी प्रशासनाला धारेवर धरले होते. आयुक्त गोयल यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते. वैद्यकीय आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी रुक्मिणीबाई रुग्णालयात सविता बिराजदार या महिलेच्या झालेल्या मृत्युप्रकरणाचा सविस्तर अहवाल आयुक्तांना दाखल केला होता. आयुक्तांच्या निर्देशावरून सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी पालिका आस्थापनेवरील चार आणि बाह्य स्त्रोत वैद्यकीय संस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन आणि सेवा समाप्तीची कारवाई केली.
पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी वरिष्ठांच्या आदेशावरून या रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एक परिचारिका प्रमुखासह तीन रुग्णवाहिका चालकांना सेवेतून निलंबित केले आहे. बाह्य स्त्रोत संस्थेच्या एक डाॅक्टर, एक परिचारिकेच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत. वंदना गुळवे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग.