ठाणे : आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था ) अभ्यासक्रमात सहा नव्या अभ्यासक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा यात समावेश असून येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत घोषणा केली आहे.
जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुरुवारी या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंत्री लोढा यांनी ही घोषणा केली आहे.
राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईन द्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. आपत्ती मानव निर्मित असो किंवा नैसर्गिक असो, याचे व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा, याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेतले पाहिजे. मानवाने प्रगती केली असली तरी, आपत्तीचे स्वरूप ही त्यानुसार बदलले असून बचावाचे प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले. या शिबिरात अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मंत्री यांचे विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले.
तर राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील आयटीआय विद्यार्थ्यांची नागरी संरक्षण या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेतली. तसेच या दोन दिवसीय शिबिरात बचाव आणि मदतकार्य याचे प्रशिक्षण ही देण्यात येणार आहे. मानव निर्मित आपत्ती यात युद्धाचा समावेश असून त्या काळात घ्यायची काळजी, उपचार आणि बचाव यावरही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत बचावाची प्रात्यक्षिके विद्यार्थिनींनी सादर केली.
राज्यातील विविध ठिकाणी असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये काही लाख विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेत असतात. या अभ्यासक्रम गेले अनेक वर्षांपासून काही ठरावीक अभ्यासक्रमच शिकवले जात असल्याची टीका अनेकदा झाली आहे. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवले जावे अशी देखील मागणी केली जात होती. याच पार्श्वभूमीवर आयटीआय अभ्यासक्रमात सहा नव्या अभ्यासक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स, थ्री डी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा यात समावेश असून येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे.