ठाणे: दिवा येथील म्हात्रे गेट भागात एका सहा वर्षीय मुलीचा कावीळ झाल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मानसी रसाळ असे तिचे नाव असून सुमारे दोन आठवड्यांपासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. दूषित पाणीपुरवठ्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मानसीच्या नातेवाईकांनी केला आहे.
म्हात्रे गेट भागातील चाळीमध्ये मानसी ही तिचे आई-वडील, आजी, दोन बहिणींसोबत राहत होती. ती अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वी तिला कावीळ झाल्याने कुटुंबियांनी उपचारासाठी मुंबई येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिचे यकृत निकामी झाल्याचे समोर आले. दरम्यान, २८ मार्चला तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिवा शहरात बहुतांश भागात इमारती व चाळींना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या या गटारातून टाकण्यात आलेल्या आहेत. यातील अनेक वाहिन्यांना छिद्र पडल्याने त्यातून नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
मानसी हिचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला आहे. ही वेळ शहरातील अन्य कुणावर येऊ नये म्हणून दिवा शहरात स्वच्छ पाणीपुरवठा करा. -सुशीला रसाळ, मानसीची आजी.