ठाणे : चमचमत्या चांदण्याच्या, आकाशाच्या सानिध्यात मेजवानीचा आस्वाद घेण्याचे तुमचे स्वप्न असेल तर ते स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण, मुंबई-ठाणे परिसरातील पहिले हवेत तरंगणारे उपाहारगृह सुरू झाले आहे. हे उपाहारगृह भिवंडी येथील अंजूर येथे सुरू झाले असून एकाचवेळी तब्बल २२ पर्यटक या उपाहारगृहात बसू शकतात. हे उपाहारगृह पाहण्यासाठी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील नागरिक गर्दी करू लागले आहे.

अंजुर येथील सया ग्रॅण्ड रिसॉर्टमध्ये सुरू झालेल्या या तरंगत्या उपाहारगृहाचे उद्धाटन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यापूर्वी अशाप्रकारचे ‘स्काय डाईंग’ बंगळूरू, गोवा, पुण्यात सुरू झाले होते. ठाणे जिल्हा आणि मुंबई शहर, उपनगरातील नागरिकांनाही आता तंरगते उपाहारगृह उपलब्ध झाल्याने पर्यटक आणि नागरिकांकडून यास पसंती मिळण्याची शक्यता आहे.