बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून उत्तरेतून येणाऱ्या कोरडय़ा आणि उष्ण वाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. गुरुवारी सलग चौथ्या दिवशी ठाणे जिल्ह्याचे सरासरी तापमान ४२ अंश सेल्सिअस इतके होते. बुधवारपेक्षा गुरुवारी तापमानात किंचित घट झाल्याचे दिसून आले. मात्र उकाडा तितक्याच प्रमाणात जाणवत होता.
जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद डोंबिवलीजवळच्या पलावा येथे झाली. दुपारच्या सुमारास पलावा येथे ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर त्याखालोखाल भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि ठाणे या शहरांचे तापमान होते.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात उष्णतेने उच्चांक गाठला आहे. बुधवारी या वर्षांतले सर्वाधिक उच्चांकी तापमान ठाणे जिल्ह्यात नोंदवले गेले. खासगी हवामान अभ्यासकांच्या कोकण हवामान गटाने या उच्चतम तापमानाची नोंद बुधवारी केली. गुरुवारीही अशाच प्रकारचे तापमान असेल असे भाकीत वर्तवण्यात आले होते. गुरुवारी सकाळपासूनच मोठय़ा प्रमाणावर उकाडा जाणवत होता. दुपारी दोन वाजेपर्यंत तापमानाने ४२ अंश सेल्सिअस पल्ला पार केला होता.
गुरुवारी पुन्हा एकदा जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद डोंबिवली शेजारील पलावा भागात करण्यात आली. पलावा भागात ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मुंबई महानगर प्रदेशात गेल्या दोन महिन्यांपासून उच्चांकी तापमानासाठी प्रसिद्ध झालेल्या ठाणे जिल्ह्याच्या शेजारच्या कर्जत शहरातही गुरुवारी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भिवंडी आणि कल्याण या शहरांमध्ये ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. बदलापूर, उल्हासनगर, तळोजा, पनवेल या शहरांमध्ये सरासरी ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ठाणे शहरात ४१.८ तर मुंब्रा आणि कोपरखैरणे येथे ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. बुधवारच्या तुलनेत तापमानात किंचित घट दिसत असली तरी उकाडा मात्र कायम होता. त्यामुळे आठवडय़ातल्या चौथा दिवशीही उष्णतेची लाट जाणवली.