आतापर्यंत किराणा, मेडिकल, इतर दुकानांमध्ये चोऱ्या होत होत्या. कल्याणमध्ये आता चोरांनी एका चप्पल दुकानालाच लक्ष्य केले. दुकानातील १७ हजार रुपये किमतीच्या किमती चपला, बुटांचे जोड चोरून नेले.

अंबरनाथमध्ये राहणाऱ्या कमल रंगलाल मंद्राई (५०) यांचा चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे कल्याण पूर्वेतील खडेगोळवली येथील जलकुंभाजवळ चप्पल विक्रीचे दुकान आहे. सकाळी नऊ वाजता दुकान उघडून रात्री १० वाजता ते दुकान उघडतात. नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी ते सकाळी दुकान उघडण्यासाठी आले. तेव्हा त्यांना दुकानाचे मुख्य लोखंडी प्रवेशद्वार तुटले असल्याचे दिसले. कुलुप जागेवर नव्हते. दुकानात चोरी झाली असण्याचा संशय त्यांना आला.

दुकानात जाऊन त्यांनी पाहिले. दुकानातील किमती चपला, बूट, महिलांच्या चपला, कमरपट्टे चोरट्यांनी चोरून नेला. या चपलांची एकूण किंमत सतरा हजार रुपये आहे. कमल मंद्राई यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.