रचना करणाऱ्या समितीची चौकशी करण्याची राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून मागणी;सहाय्यक नगररचनाकारांकडून कार्यमुक्तीसाठी अर्ज

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर: आगामी नगरपालिका निवडणुकांसाठी कच्ची प्रभाग रचना करण्याच्या कामात काही अधिकारी विशिष्ट व्यक्ती तसेच राजकीय पक्षांना झुकते माप देत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या आठवडय़ात कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या समितीवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतर या समितीतील सदस्य आणि सहायक नगररचनाकार सुदर्शन तोडणकर यांनी या समितीतून कार्यमुक्त करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

या मागणीमुळे आमच्या आरोपांना बळ मिळाले असून या अधिकाऱ्यांची आर्थिक गुन्हे शाखेतर्फे चौकशीची मागणी आशीष दामले यांनी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच नगरपालिका, महापालिका या शिवसेना पक्षाच्या ताब्यात असून येत्या काही महिन्यांत या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पालिका स्तरावर प्रभार रचना करण्याचे काम सुरू आहे. या प्रभाग रचनेत सोयीचे प्रभाग निर्माण व्हावेत यासाठी काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून पालिकेच्या प्रभाग रचना समितीतील सदस्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. गेल्या आठवडय़ात बदलापूर शहरातील प्रभाग रचनेचे काम एका खासगी रेसॉर्टमध्ये बसून केले गेल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष आशीष दामले यांनी खळबळ उडवून दिली होती. या वेळी त्यांनी सहायक नगररचनाकार सुदर्शन तोडणकर यांना लक्ष्य केले होते.

या प्रकारची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक आयोगाकडेही दामले यांनी केली होती. तर दोन सदस्यीय प्रभाग रचनेत सध्या अस्तित्वात असलेले कोणते दोन प्रभाग जोडले जातील त्याची यादीही दामले यांनी जाहीर केली होती. त्यामुळे बदलापुरातील प्रभाग रचना वादात सापडली होती. या कच्च्या प्रभाग रचनेची माहिती समाजमाध्यमांवरही प्रसारित झाली होती. पालिकेच्या समितीवर झालेल्या आरोपानंतर आता या समितीत सहायक नगररचनाकार सुदर्शन तोडणकर यांनी आपल्याला कार्यमुक्त करावे अशी मागणी केली आहे. तसे पत्र तोडणकर यांनी मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना २ डिसेंबर रोजी दिले आहे. हे पत्र सादर करत आम्ही केलेले आरोप योग्य असल्याचा दावा आशीष दामले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. कारवाईपासून वाचण्यासाठी ही चाललेली धडपड असून रचनेचे काम संपल्यावर हे पत्र दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे प्रभाग रचनेची कामे गोपनीयता बाळगून व्हावी तसेच या अधिकाऱ्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी व्हावी अशी मागणी आपण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केल्याचेही दामले यांनी सांगितले आहे.

प्रामाणिकपणे काम करूनही आरोप’

प्रामाणिकपणे काम करूनही आरोप होत असल्याने समितीतून कार्यमुक्त करण्याची मागणी केल्याचे सुदर्शन तोडणकर यांनी सांगितले आहे. तर असे पत्र अजून तरी आपल्याला मिळाले नसल्याचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी सांगितले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slope word structure remains ysh
First published on: 07-12-2021 at 01:38 IST