अभय योजनेला थंड प्रतिसाद, विक्रमी वसुलीची उल्हासनगर महापालिकेला आशा

लोकसत्ता प्रतिनिधी

उल्हासनगर : टाळेबंदीच्या काळात उल्हासनगरसारख्या व्यापारी शहरातील नागरिकांना झालेल्या आर्थिक नुकसानीत दिलासा देण्यासाठी पालिकेने अभय योजना घोषित केली असली तरी पुन्हा करोनाबाधितांची संख्या वाढल्याने टाळेबंदीच्या भीतीने अभय योजनेतील करभरणाही मंदावल्याचे समोर आले आहे. १८ फेब्रुवारी ते २ मार्च या १३ दिवसाच्या कालावधीत अवघे ११ कोटी रुपयांची वसुली करण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे यंदाची अभय योजना यापूर्वीच्या अभय योजनांच्या तुलनेत अपयशीच ठरण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

उल्हासनगर महपालिकेत गेल्या काही वर्षांत मालमत्ता कराची थकबाकी तब्बल ५४२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षांत पालिका प्रशासनाने स्थायी समितीला मांडलेला अर्थसंकल्पही या थकबाकीपेक्षा कमी होता. त्यामुळे मालमत्ता कराच्या वसुलीचे मोठा आव्हान पालिका प्रशासनापुढे कायमच राहिले आहे. मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी २०१५मध्ये पालिकेने पहिल्यांदा अभय योजना लागू केली होती. त्यानंतर जवळपास प्रत्येक वर्षांत पालिका प्रशासनाने अभय योजना राबवली. मात्र त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. यंदाच्या वर्षांत पालिकेने पुन्हा अभय योजनेची घोषणा केली. १८ फेब्रुवारी ते ७ मार्च आणि ८ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत दोन टप्प्यांत अभय योजना सुरू आहे. मात्र गेल्या १३ दिवसांत पालिका प्रशासनाला अवघे ११ कोटी रुपये वसूल करण्यात पालिका प्रशासनाला यश आल्याची माहिती समोर आली आहे.

पहिल्या टप्प्यात थकबाकीसह चालू कराची रक्कम २० टक्के शास्तीसह एकरकमी भरल्यास ८० टक्के शास्तीमध्ये सूट दिली जाणार आहे. असे असतानाही फक्त ११ कोटींचा करभरणा झाल्याने पालिकेच्या अभय योजनेकडे करदात्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा आहे. पहिल्या टप्प्यातील ८० टक्के शास्तीमध्ये सुट मिळवण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून त्यानंतर शास्तीमध्ये अवघी ५० टक्के सुट मिळणार आहे. त्यामुळे ८० टक्के शास्ती माफी असतानाही करभरणा करण्याकडे पाठ फिरवणारे मालमत्ता धारक ५० टक्के शास्तीमाफीत किती प्रतिसाद देतील हा प्रश्न उपस्थित होत आहे. पुन्हा टाळेबंदीच्या शक्यतेने करभरणा मंदावल्याचे बोलले जाते आहे, तर एकूण १ लाख ८० हजार मालमत्ताधारकांना देण्यात येणाऱ्या कराच्या बिलाच्या पावत्यांपैकी सुमारे ३० हजार पावत्या कायम परत येतात, अशीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे तब्बल १७ टक्के करदाते सापडत नसल्याने एक मोठा टक्का कर भरण्यापासून दूर गेला आहे.

करभरणा वाढवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीच्या उद्घोषणा करणाऱ्या रिक्षा फिरवल्या जात आहेत. नागरिक सुविधा केंद्र सकाळी लवकर सुरू होऊन रात्री उशिरा बंद होत आहेत. १६ कर निरीक्षक, २४ लिपिक यात कार्यरत आहेत. त्यामुळे चांगली वसुली होईल अशी आशा आहे.

– डॉ. राजा दयानिधी, आयुक्त, उल्हासनगर महापालिका.