धारोळवाडी, लव्हाळी-तालुका अंबरनाथ
चौथी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बदलापूरपासून अवघ्या १५ किमी अंतरावर दुर्गम डोंगरभागात अनेक आदिवासी वस्त्या आहेत. लव्हाळी, धोरोळवाडी, सांबारी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वस्त्यांमध्ये आदिवासी ठाकूर समाज मोठय़ा प्रमाणात राहतो. अंबरनाथ तालुक्याचे टोक असणाऱ्या या वस्त्या ठाणे-रायगड जिल्ह्य़ाच्या सीमारेषेवर आहेत..

ठाणे आणि नव्याने स्थापन झालेला पालघर या दोन्ही जिल्ह्य़ांत बहुतेककरून कातकरी आणि वारली या आदिवासी जमातींच्या प्रामुख्याने वस्त्या असल्या तरी डोंगर-दऱ्यांमधील वस्त्यांमध्ये ठाकूर (ठाकर) समाजही मोठय़ा प्रमाणात आहे. विशेषत: चौथी मुंबई म्हणून ओळखल्या जात असलेल्या अंबरनाथ तालुक्यात या समाजाची बरीच वस्ती आहे. नागरीकरणाच्या रेटय़ातही आपली वैशिष्टय़पूर्ण संस्कृती या समाजाने टिकवून ठेवली आहेच, शिवाय योग्य संधी मिळाली तर आधुनिक युगातही नैपुण्य दाखविण्याची पुरेपूर क्षमता असल्याचे दाखवून दिले आहे.
अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर शहराची वेस ओलांडून मुरबाड-कर्जतच्या दिशेने जाताना लव्हाळी कुडेरान, सांबारी, वाडय़ाची वाडी, नंबरवाडी, रात्रीची वाडी, धारोळवाडी असे अनेक पाडे किंवा वाडय़ा लागतात. धारोळवाडी ही दोन डोंगरांच्या मध्ये असलेली अंबरनाथ तालुक्यातील शेवटची वस्ती. पुढे कर्जत तालुका लागतो. जेमतेम ७०० लोकसंख्या असलेल्या या सीमेवरच्या वस्तीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही आपली परंपरागत संस्कृती टिकवून ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. ठाकूर समाजातील पारंपरिक नृत्य कला या वाडीतील कला पथकाने महाराष्ट्रभर नेली. महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे पारंपरिक नृत्याचे ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येत. धारोळवाडीतील तातू शिद, एकनाथ शेंडे आदी मंडळींनी ही कला अजूनही जतन केली आहे. गावात कुणी बाहेरचे पाहुणे आले की आपला हा कलाविष्कार ते सादर करतात.
धरण असलेल्या प्रदेशात पाणीटंचाई हा विरोधाभास या भागातही आहे. ठाणे जिल्ह्य़ाच्या पाणीपुरवठय़ाचे प्रमुख स्रोत असलेले बारवी धरण जवळ असूनही या भागातील एकाही गावासाठी धडपणे पाणी योजना राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे विहीर आणि कूपनलिकांमधून मिळणाऱ्या पाण्यावरच त्यांना अवलंबून रहावे लागते. मार्च महिन्यानंतर विहिरी आटू लागल्या की वस्त्यांवरील रहिवाशांची, त्यातही महिलांची पाण्यासाठी वणवण सुरू होते. गावातील रस्त्यांचीही दारुण अवस्था आहे.
अशा प्रकारे प्रतिकूलता पाचवीला पूजलेली असली तरी या वस्त्यांवरील रहिवासी त्याचा सामना करीत आनंदाने जीवन जगतात. पारंपरिक नृत्य आणि गाण्यांबरोबरच अलीकडच्या काळात प्रौढ ग्रामस्थांना भजनांचा छंद लागला आहे. धारोळवाडीचेही भजनी मंडळ आहे आणि परिसरात निरनिराळ्या निमित्ताने त्यांचे कार्यक्रम होत असतात. गावात होळी, हनुमान जयंती, पिठोरी अमावास्या, गणपती हे सण उत्साहाने साजरे केले जातात. या निमित्ताने ग्रामस्थ हौसेने आपल्या कला सादर करीत असतात. गावातले बहुतेकजण शेतमजूर अथवा नोकरी करतात. त्याचबरोबर शेळ्या, मेंढय़ा पालन हा काहींचा जोड व्यवसाय आहे.

लव्हाळीचे शिक्षण केंद्र

इतर प्राथमिक सुविधांप्रमाणेच या भागात शैक्षणिक सुविधांचीही आबाळ होती. जिल्हा परिषदेच्या चौथीपर्यंत असणाऱ्या शाळेव्यतिरिक्त पुढील शिक्षणाची कोणतीही सुविधा नव्हती. त्यामुळे केवळ धारोळवाडीच नव्हे तर पंचक्रोशीतील वीसहून अधिक पाडय़ांवरील रहिवाशांना शिक्षणाचा गंध नव्हता. त्यामुळे दिवंगत शिवसेना नेते साबीर शेख यांनी याकामी पुढाकार घेऊन गुरुवर्य नानासाहेब सबनीस शिवभक्त आश्रमशाळा लव्हाळी येथे सुरू केली. रमेश भुटेरे आणि त्यांची पत्नी सायली भुटेरे या खाजगी आश्रमशाळेचे कामकाज पाहतात. लव्हाळीच्या या आश्रमशाळेने या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून दिले. परिसरातील वाडी-वस्त्यांवरील आदिवासी मुलांनी या संधीचे अक्षरश: सोने केले. गेल्याच वर्षी या आदिवासी आश्रमशाळेतून दहावीच्या परीक्षेला ३३ मुले पहिल्यांदाच बसली. विशेष म्हणजे पहिल्याच वर्षी शाळेचा निकाल शंभर टक्के लागला. शिक्षणाप्रमाणेच इतर कला आणि क्रीडा प्रकारांमध्येही ही मुले विशेष चमक दाखवीत आहेत. तालुका, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धामध्ये लव्हाळीच्या विद्यार्थ्यांनी चमकदार यश मिळविले आहे. सध्या या आश्रमशाळेत पाचवी ते दहावीची एकूण ४५० मुले शिकतात. जवळपासच्या वाडय़ा-वस्त्यांवरील मुले घरी जातात, तर लांबवरची मुले आश्रमशाळेतील वसतिगृहात राहतात. येथील नव्या पिढीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य ही शैक्षणिक संस्था करीत आहे. ‘चतुरंग’ संस्थेने अलीकडेच रौप्यमहोत्सवानिमित्त महाराष्ट्रात लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या २५ संस्थांचा गौरव केला. त्यात लव्हाळीच्या या आश्रमशाळेचा समावेश आहे. अंबरनाथ तालुक्यात शासकीय आश्रमशाळा नाही. ती उणीव लव्हाळीच्या या शाळेने भरून काढली आहे.

पंचक्रोशीत क्रिक्रेटबाबत दरारा
ठाकूर समाजातील ही मुले नैसर्गिकरीत्या चपळ आहेत. त्यामुळे क्रीडा स्पर्धामध्ये ते चांगले नैपुण्य मिळविताना दिसतात. पूर्वी कबड्डी खेळ लोकप्रिय होता. प्रत्येक वाडीत किमान एक कबड्डीचा संघ असायचा. आताही काही प्रमाणात कबड्डी खेळली जात असली तरी त्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याची जागा आता क्रिक्रेटने घेतली आहे. धारोळवाडीतील लिटिल स्टार क्रिकेट संघाची कीर्ती तर अगदी मुंबईपर्यंत पोचली आहे. २००४ पासून क्रिकेट खेळणाऱ्या धारोळवाडीतील संघाने आतापर्यंत ठाणे-रायगड जिल्ह्य़ातील विविध स्पर्धामधून तब्बल २५० हून अधिक अजिंक्यपदे मिळविली आहेत. अचूक गोलंदाजी, चपळ क्षेत्ररक्षण आणि भेदक फलंदाजी असणाऱ्या या संघाला हरविणे हे भल्या भल्या संघांना जड जाते. सांघिक विजेतेपदासाठी मिळालेले पैसे गावातील सार्वजनिक कामासाठी वापरले जातात. त्यातील काहीजण शिक्षण तर काही नोकरी करतात. मात्र वाडीत असले की दुपारी तीन ते संध्याकाळी सात त्यांचा सराव सुरू असतो. क्रिकेट स्पर्धामधून मिळालेल्या पैशातून त्यांनी गावात सार्वजनिक उत्सवासाठी लागणारी भांडी खरेदी केली आहेत. गावात कुणी आजारी पडला तर त्याला वैद्यकीय उपचारांसाठीही संघाकडून मदत केली जाते. संघातील आजी-माजी खेळाडूचे लग्न ठरले, तर त्यालाही याच निधीतून काही पैसे दिले जातात. संघाच्या गंगाजळीत सध्या चार लाख रुपये शिल्लक असल्याची माहिती अनिल शेंडे यांनी दिली. सध्या एकलव्य बाण्याने क्रिकेटचे धडे गिरविणाऱ्या या तरुणांना अद्ययावत प्रशिक्षण, सुविधा आणि योग्य संधीची आवश्यकता आहे.

सॅमसंगचे स्मार्ट स्कूल
आदिवासी विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक प्रगती पाहून ‘सॅमसंग’ या बहुराष्ट्रीय कंपनीने लव्हाळीतील आश्रमशाळेत त्यांच्यासाठी स्मार्ट स्कूल उभारले आहे. आधुनिक पद्धतीने शिक्षण देणाऱ्या या स्मार्ट स्कूलमध्ये २० लॅपटॉप, डिजिटल फळा, त्याला अनुरूप अद्ययावत फर्निचर आहे. या स्मार्ट स्कूलची उभारणी पूर्ण झाली असून लवकरच कंपनी व्यवस्थापनातर्फे हे स्मार्ट स्कूल लव्हाळी परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे.