ठाणे : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्यांच्या या निर्णयावर आता ठाकरे समर्थकांकडून सोशल मीडियावरून उपहासात्मक टीका होत असून, काहींनी त्यांना “हा आहे डोंबिवलीचा फिरता वर्ल्डकप! आज इकडे तर उद्या तिकडे!” असे म्हणत चिमटे काढले आहेत.

डोंबिवली जिमखान्यात झालेल्या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत म्हात्रे यांचा भाजप प्रवेश पार पडला. त्यांच्या मातोश्री माजी नगरसेविका रत्नाबाई म्हात्रे, बंधू माजी नगरसेवक जयेश आणि त्यांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

माजी खासदार कपील पाटील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा पुढाकार या प्रवेशासाठी महत्वाचा ठरला. मिरवणुकीच्या जल्लोषात म्हात्रे कुटुंबाने आपल्या समर्थकांसह कार्यक्रम स्थळी हजेरी लावली. म्हात्रे यांनी प्रवेशानंतर सांगितले की, “राष्ट्रीय हित आणि हिंदुत्वाच्या मूल्यांसाठी तसेच जनतेच्या समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी मी भाजपमध्ये आलो आहे. पक्षातून नक्कीच ताकद मिळेल, असा मला विश्वास आहे.”

https://www.facebook.com/share/p/1A4zqgFs9C

मागील काही महिन्यांपासून म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर या प्रवेशाने त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या कार्यक्रमात माजी काँग्रेस सचिव संतोष केणे, त्यांच्या मुलांसह आणि कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते मनोज वैद्य, राजू सावंत, संदीप सामंत, अरविंद मानकर यांचाही पक्षप्रवेश झाला. कल्याण-डोंबिवलीतील उद्योजक, व्यापारी आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन भाजपने या प्रवेश मोहिमेला गती दिली असून, आणखी काही मोठे प्रवेश लवकरच होणार असल्याची माहिती पक्षनेत्यांनी दिली. दरम्यान, दीपेश म्हात्रे यांच्या प्रवेशानंतर ठाकरे समर्थकांनी सोशल मीडियावरून त्यांच्यावर उपहासात्मक टीका सुरु केली असून, काहींनी त्यांना “हा आहे डोंबिवलीचा फिरता वर्ल्डकप! आज इकडे तर उद्या तिकडे!” असे म्हणत चिमटे काढले आहेत. तसेच अशी गद्दारी लख लाभो असेही म्हटले आहे.