वंचितांच्या उत्कर्षांसाठी विधायक चळवळ

ब्रि टिशांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण त्या व्यवस्थेत गृहीत धरण्यात आलेली समानता मात्र समाजाच्या सर्व थरांमध्ये पोहोचली नाही.

ब्रि टिशांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण त्या व्यवस्थेत गृहीत धरण्यात आलेली समानता मात्र समाजाच्या सर्व थरांमध्ये पोहोचली नाही. गरिबी, निरक्षरता, व्यसनाधीनता, जातिभेद आदी कारणांमुळे समाजातील फार मोठा घटक दारिद्रय़ाच्या दुष्टचक्रात भरडला गेला. आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सर्व बाबतीत तो मागे पडला. गुणवत्ता असूनही या समाजातील अनेकजण केवळ आत्मविश्वासाचा अभाव आणि न्यूनगंडामुळे मागे पडले. आणीबाणीनंतर समाजातील ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गातील ही दरी कमी व्हावी, यासाठी ठाण्यात काहीजणांनी प्रयत्न सुरू केले. ऐंशीच्या दशकात खारटन रोड, कोपरी, चिरागनगर आदी वस्त्यांमध्ये समता आंदोलन नावाने ही चळवळ सुरू झाली. त्यावेळी शहरातील ८५ झोपडपट्टय़ांमध्ये या मंडळींनी शिक्षणविषयक सर्वेक्षण केले. तेव्हा या वस्त्यांमधील पहिलीला शाळेत प्रवेश घेणाऱ्या १०० मुलांपैकी फक्त सात मुले दहावीपर्यंत पोचत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सफाई कामगारांच्या मुलांना वारसा हक्काने पालिकेत नोकरी मिळत होती. ‘मग कशाला शिकायचे’ अशी त्यामागची वृत्ती होती. पालकांचे व्यसन, गरिबी आदी कारणांमुळेही शिक्षणात खंड पडत होता. काही मुलांना कोवळ्या वयात पैसे कमविण्यासाठी मिळेल ते काम करावे लागे. आताही काही प्रमाणात ही परिस्थिती आहे. तेव्हा शालेय शिक्षण हे मूलभूत हक्कात गणले गेले नव्हते. ठाणे शहरात फक्त पाच बालवाडय़ा होत्या. त्यामुळे वंचितांच्या शिक्षणाविषयी सजग असणाऱ्या ठाण्यातील काही मंडळींनी पुढाकार घेत ठाणे पालिकेवर ‘पाटी पेन्सिल’ मोर्चा नेला. या मोर्चानंतर पालिकेने आपले शिक्षणविषयक धोरण बदलले. सुरुवातीची काही वर्षे अनौपचारिक रूपात असणाऱ्या चळवळीला जुलै १९९३ मध्ये समता विचार प्रसार संस्था या नावाने संस्थात्मक स्वरूप देण्यात आले. महागाई, बेरोजगारी, स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, समाज प्रबोधन आणि अर्थातच शिक्षण प्रसार आदी प्रकारचे उपक्रम संस्थेतर्फे ठाण्यात सातत्याने राबविले जात आहेत. जयदीश खैरालिया हे संस्थेचे अध्यक्ष तर लतिका सुप्रभा मोतीराम या सचिव आहेत.

पुस्तकपेढी
एकलव्य पुरस्काराच्या निमित्ताने संपर्कात आलेल्या ठिकठिकाणच्या हरहुन्नरी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणात मदत करण्याचे कामही संस्थेतर्फे केले जाते. त्यातूनच पुस्तकपेढी उपक्रम राबविला जातो. त्यातून मुलांना अभ्यासासाठी लागणारी पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून दिली जातात. काम झाल्यानंतर ती पुस्तके विद्यार्थ्यांकडून परत घेतली जातात. या उपक्रमाचे व्यवस्थापनही पूर्वाश्रमीचे एकलव्यच करतात. अकरावीपासून पदवीपर्यंत तसेच अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तकेही या पेढीमार्फत दिली जातात. पुस्तकांचे संच खरेदी करण्यासाठी देणगीदारांचा शोध घेतला जातो. सध्या महाविद्यालयांमध्ये विविध इयत्तांमध्ये शिकत असलेले तब्बल ३०० विद्यार्थी या पुस्तकपेढीचा लाभ घेत आहेत.

समता संस्कार शिबीर
एप्रिल महिन्यात संस्थेतर्फे येऊरमध्ये युवक-युवतींसाठी समता संस्कार शिबीर आयोजित केले जाते. श्रम प्रतिष्ठा, समानता, अंधश्रद्धा निर्मूलन आदी विषयांबाबत शिबिरात तरुणांचे उद्बोधन केले जाते. त्यात समाजातील सर्व थरातील मुले सहभागी होतात.

क्रीडा स्पर्धा
दरवर्षी केल्या जाणाऱ्या एकलव्य सर्वेक्षणानिमित्ताने ठाण्यातील शिवाईनगर, येऊर, रामचंद्रनगर, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, कोपरी, कळवा, राबोडी, माजिवडा, बाळकुम, मानपाडा आदी ठिकाणी संस्थेने चांगलाच जम बसविला आहे. या मुलांमधील क्रीडागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात संस्थेतर्फे क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. त्यात क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ आदी स्पर्धा घेतल्या जातात. प्रत्येक वस्तींचे संघ या स्पर्धेत सहभागी होत असतात.

खादी विक्री केंद्र
२ ऑक्टोबर ते ३० जानेवारी या कालावधीत संस्थेतर्फे खादी विक्री केंद्र चालविले जाते. वध्र्याहून मागणीनुसार खादीचे कपडे मागविले जातात. स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देणे हा त्यामागचा एक हेतू असतोच, शिवाय या माध्यमातून संस्थेच्या तरुण कार्यकर्त्यांना व्यवसायाचे धडेही दिले जातात. स्वत: काम करून त्यांना चार पैसे कमविता यावेत, हा त्यामागचा हेतू असतो.

वंचितांचा रंगमंच
गेल्या वर्षी संस्थेने वंचितांचा रंगमंच हा एक अभिनव उपक्रम राबविला. झोपडपट्टय़ांमधील किशोरवयीन मुले-मुली तसेच तरुणांनी त्यांचे भावविश्व मांडणारी नाटके या रंगमंचावर सादर केली. ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांनी या मुलांना मार्गदर्शन केले.

अक्षय ऊर्जा अभियान
उपकरणांमधला दोष, अज्ञानामुळे होणारा अपव्यय आदी कारणांमुळे दैनंदिन जीवनात आपण अमूल्य ऊर्जा वाया घालवीत असतो. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी संस्थेने यंदा अक्षय्य उर्जा अभियान राबविले. सोसायटी स्तरावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
संपर्क- समता विचार प्रसारक मंडळ, गाळा क्र. ५६, दादोजी कोंडदेव स्टेडिअम, ठाणे (प). संपर्क-९९६९१०४८३६, ९७६९२८७२३३.

राममोहन लोहिया व्याख्यानमाला
गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ ठाणे शहरात दरवर्षी संस्थेतर्फे राममोहन लोहिया व्याख्यानमाला आयोजित केली जाते. डिसेंबर महिन्यात होणारा हा उपक्रम ठाण्यातील सांस्कृतिक जीवनात महत्त्वपूर्ण मानला जातो. रोहिणी हट्टंगडी, निळू दामले, अब्दुल कादर मुकादम, अरुणा रॉय, तिस्ता सेटलवाड, मेधा पाटकर, डॉ. योगेंद्र यादव, हरि नरके आदी अनेक दिग्गजांनी या व्याख्यानमालेनिमित्त ठाण्यात विचार मांडले आहेत. रौप्य महोत्सवानंतर आता ही व्याख्यानमाला शहरातील निरनिराळ्या वस्त्यांमध्ये होते. ‘व्याख्यान तुमच्या दारी आणि व्याख्याता तुमच्या घरी’ असे या उपक्रमाचे सध्याचे घोषवाक्य आहे. एकाच ठिकाणी व्याख्यानमाला ठेवल्याने शहरातील काही ठरावीक नागरिकच त्याचा लाभ घेतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मान्यवर वक्त्यांचे विचार पोहोचावेत, हा यामागचा हेतू आहे.

एकलव्य पुरस्कार
आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत कमालीचे अंतर असल्याने केवळ दहावीत मिळणारे टक्के या एकाच मापाने गुणवत्ता मोजणे चुकीचे आहे. कारण अनेक मुले अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही अभ्यास करून दहावीत उत्तीर्ण होतात. त्यामुळे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ संस्थेतर्फे अशा विद्यार्थ्यांचा एकलव्य पुरस्कार देऊन गौरव केला जातो. दरवर्षी दहावीचा निकाल लागल्यानंतर संस्थेतर्फे विविध वस्त्यांमध्ये सर्वेक्षण केले जाते. पुरस्काराच्या रूपाने पाठीवर थाप मारल्याने त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. ठाण्यातील अशा अनेक एकलव्यांनी त्यांना देण्यात आलेल्या या प्रोत्साहनामुळे जिद्दीने उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. या एकलव्यांपैकी काहीजण डॉक्टर्स, इंजिनीयर्सही झाले आहेत. शहरातील अनेक संवेदनशील नागरिक अशा एकलव्यांना संघटनेच्या माध्यमातून मदत करीत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Social movement

ताज्या बातम्या